गोवा क्रांतीदिनी हिंदुत्वनिष्ठांची मागणी : ऐतिहासिक ‘हातकातरो’ खांबाचे जतन करा !
पणजी : गोव्यातील स्थानिक राष्ट्रप्रेमी, देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि हिंदु जनजागृती समिती यांनी १८ जून, म्हणजेच गोवा क्रांतीदिनी जुने गोवा येथील पोर्तुगीज राजवटीतील ‘इन्क्विझिशन’ अत्याचारांच्या वेळी बलीदान दिलेल्या गोमंतकीय हिंदूंच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या ‘हातकातरो’ खांबाच्या (inquisition pillar) ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रम केला. या कार्यक्रमात ‘या हातकातरो खांबाची ऐतिहासिक पुरातन वास्तू म्हणून नोंदणी करून तिचे त्वरित संवर्धन करावे’, अशी मागणी सर्व हिंदूंनी या खांबाच्या भोवती मानवी साखळी बनवून केली. या वेळी उपस्थितांनी ‘इन्क्विझिशन’ अत्याचारात बलीदान दिलेल्या गोमंतकीय हिंदूंना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण केली.
या वेळी गोव्यातील इतिहास अभ्यासक तथा ‘गोवा हेरिटेज अॅ क्शन ग्रुप’चे उपाध्यक्ष प्रा. प्रजल साखरदांडे, भारत स्वाभिमानचे गोवा प्रभारी श्री. कमलेश बांदेकर, ‘वन्दे मातरम्’ साखळी संघटनेचे श्री. समीर गांवस, हिंदु धर्माभिमानी श्री. रामकृष्ण कामत, हिंदु जनजगृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे, समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु विधीज्ञ परिषदेचे गोवा राज्य सचिव अधिवक्ता नागेश ताकभाते, हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी, श्री. जयेश थळी, शिवसेनचे श्री. माधव विर्डीकर आदी उपस्थित होते.
शासनाला हिंदूंच्या बलीदानाचे प्रतीक मिटवू देणार नाही ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती
वर्ष २००६ पर्यंत शासनाच्या कागदपत्रांत उल्लेख असलेल्या हातकातरो खांबाविषयीच्या नोंदी मिटवण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे केला जात आहे. स्वाभिमानी हिंदूंच्या बलीदानाचे प्रतीक असलेल्या या खांबाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आमच्या पूर्वजांच्या बलीदानाचा हा इतिहास आम्ही मिटवू देणार नाही. गोवा शासनाने खांबाचे संवर्धन न केल्यास देशभरात हिंदू यासंदर्भात आंदोलने करतील आणि या खांबाच्या संरक्षणाविषयी पुढचा निर्णय घेतील, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी या वेळी दिली. १०० वर्षे पूर्ण झालेल्या वास्तूंना संरक्षित वास्तूंच्या यादीत टाकून त्यांच्या दुरुस्तीत अडथळे निर्माण करणाऱ्यां प्रशासनाला या १३ व्या शतकातील स्तंभाचे संवर्धन करावेसे न वाटणे आश्चर्यकारक आहे, असा प्रश्न श्री. शिंदे यांनी उपस्थित केला.
श्री. जयेश थळी यांनी क्रांतीदिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले आणि आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. कदंब राजकाळातील श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या तोडलेल्या या खांबाचा वापर हिंदूंना, तसेच गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी केला जात असे. यासाठी या खांबाचा उल्लेख ‘हातकातरो खांब’ असा केला जातो. या खांबावर कन्नड भाषेत शिलालेखही आहे, अशी माहिती प्रा. प्रजल साखरदांडे यांनी या खांबाच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयी माहिती देतांना दिली. या खांबाला आतापर्यंत दोनदा वाहनांनी धडक दिल्याने चौथऱ्यांची हानी झाली आहे. यापुढे कोणती दुर्घटना घडण्यापूर्वी शासनाने या खांबाचे संवर्धन करायला हवे, अशी मागणी प्रा. साखरदांडे यांनी केली. हातकातरो खांबाच्या संवर्धनासाठी गोव्याच्या क्रांतीदिनी देशभरातील हिंदुत्वनिष्ठांना संघटित करणाऱ्यां हिंदु जनजागृती समितीचे, तसेच देशभरातून उपस्थित हिंदुत्वनिष्ठांचे भारत स्वाभिमानचे श्री. कमलेश बांदेकर यांनी कौतुक करून आभार मानले. श्री. बांदेकर म्हणाले, ‘‘आपल्या स्वातंत्र्यवीरांनी रक्ताचे सिंचन करून या भूमीचे रक्षण केले आहे. ‘इसिस’च्या आतंकवाद्यांच्या क्रौर्यालाही मागे टाकणारे क्रौर्य पोतुगिजांनी येथील हिंदूंवर अत्याचार करतांना दाखवले होते. अनेक ख्रिस्त्यांनाही आपले पूर्वज हिंदू होते आणि त्यांच्यावर पोर्तुगिजांनी अत्याचार केले, याची जाण आहे. आपल्या पूर्वजांच्या बलीदानाच्या स्मारकाचे संवर्धन करण्यासाठी देशभरातील हिंदू एकत्र आलेला आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिण्यासारखा आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात