आज पुण्यात माऊलींच्या पालखी सोहळ्यात काही गैरसमजुतीमुळे श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि वारकरी यांच्यात गोंधळ झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात पोलीस आणि वारीचे चोपदार यांच्यात वाद झालेला असतांना त्याला श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढणे आहे. महाराष्ट्रात वारकरी आणि धारकरी हे एकाच परंपरेचे दोन अविभाज्य भाग आहेत. श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि पू.संभाजीराव भिडेगुरूजी गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेनुसार वारीत सहभागी होत आहेत. त्यामुळे त्यांचे वारकर्यांशी स्नेहाचे संबंध असल्याचे स्पष्ट होते. तसेच वारकरी संप्रदायाची ओळख शांत, सहिष्णु, पांडुरंगाच्या भक्तीत लीन अशी आहे.त्यामुळे पोलीस यंत्रणेने हा गोंधळ मिटवण्याच्या ऐवजी वयोवृद्ध आणि तपोवृद्ध पू. भिडेगुरुजी अन् श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे अधिकाराचा अतिरेक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले श्री. देवेंद्र फडणवीस यांनी याची त्वरित दखल घेऊन पू. भिडेगुरुजी आणि त्यांच्या सहकार्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे पू. भिडेगुरुजी यांच्यासारख्या एका वयोवृद्ध व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल करणार्या पोलीस अधिकार्याला त्वरित निलंबित करण्यात यावे, अशीही मागणी करत आहोत.