पुणे : चित्रपट, मालिका, सामाजिक संकेतस्थळे (सोशल मीडिया) यांच्या माध्यमातून असत्याचा पुष्कळ मारा होत आहे. त्यातून हिंदु धर्माविषयी रानटीपणाची भावना निर्माण झाली असून विज्ञानांधळेपणा वाढत आहे. असत्यालाच सत्य मानले जात आहे. गेल्या ७० वर्षांत लोक वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट (ideologically subvert) झाल्याने सत्य समोर असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे परखड प्रतिपादन करत ज्येष्ठ विचारवंत आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी समाजाच्या सद्यस्थितीविषयी मार्मिक भाष्य केले. त्यांनी दिलेल्या अनेक चपखल उदाहरणांमुळे श्रोत्यांमध्ये आजूबाजूच्या असत्य विश्वाविषयी सतर्कतेचे भान आले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या (सिंहगड विभाग) प्रथम वर्धापनदिनानिमित्त १८ जून या दिवशी येथील सिद्धार्थ मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी डॉ. शेवडे लिखित ‘सत्य सांगा ना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे, पुणे जिल्हाध्यक्ष श्री. आनंद दवे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. स्नेहदीप कुलकर्णी, शिल्पा व्यापारी, दैनिक सकाळच्या पत्रकार सौ. जागृती कुलकर्णी यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. प्रास्तविक श्री. आनंद दवे यांनी केले, तर श्री. विश्वजीत देशपांडे यांनी महासंघाच्या कार्याचा मागोवा घेतला.
डॉ. शेवडे यांनी मांडलेली अन्य सूत्रे
१. मुसलमानांनी हिंदूंची डोकी मारली आणि इंग्रजांनी बुद्धी मारली; ते अधिक घातक आहे. लोक बुद्धी गहाण ठेवून आणि इतके गलथानपणे वागतात की, पूर्वपुण्याईवरच हा देश चालू आहे कि काय, असे वाटते. सत्य समोर असूनही, तसेच पुरावे असूनही त्यावर विश्वास ठेवायला लोक सिद्ध होत नाहीत.
२. गेल्या काही वर्षांमध्ये सुधारणेच्या नावाखाली हिंदूंचे मनोधैर्य खच्ची केले गेले. ब्राह्मण नावाचा काल्पनिक शत्रू निर्माण केला गेला. सध्या देशद्रोह्यांना नायक ठरवण्याचा आणि बॉम्बस्फोट करणार्यांकडे मानवतावादी दृष्टीकोन ठेवून देशात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न होत आहे.
३. एखादी गोष्ट १० वेळा सांगितली की, सत्य वाटू लागते. मालिका, चित्रपट या माध्यमांतूनही अन्य धर्मियांना सद्वर्तनी, तर हिंदूंना खलनायक दाखवले जाते; पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामागील सत्य आपण लक्षात घेत नाही.
‘सत्य भ्रामक केले जात असून ते शोधण्याचा प्रयत्न केला, तर ते गवसते’, असे श्री. भाऊ तोरसेकर यांनी सांगितले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
सनातनविषयीचा प्रसारमाध्यमांचा असत्य प्रचार प्रश्नचिन्हांकित !
डॉ. शेवडे म्हणाले, ‘‘सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड याची जामिनावर मुक्तता झाल्यानंतर सामाजिक संकेतस्थळांवर स्वतः न्यायाधीश झाल्याप्रमाणे प्रचार चालू झाला. ‘तो खुनी आहे. त्याला मोकाट का सोडले ?’, असे प्रश्न उपस्थित केले गेले. वस्तूतः न्यायालयात अपराध सिद्ध होईपर्यंत कुणीही दोषी नाही, तर संशयितच असतो. कर्नल पुरोहित यांच्या संदर्भातही असेच आहे. हिंदू आतंकवाद हा शब्दही असाच रूढ केला गेला. बातम्यांमधून सिमीच्या आतंकवाद्याचा केवळ अतिरेकी म्हणून उल्लेख केला जातो; मात्र सनातनचे नाव गोवले की, ‘हिंदू’ आतंकवादी असा उल्लेख केला जातो.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात