Menu Close

श्री महालक्ष्मी मंदिर आणि वारसास्थळे ही राजकीय अन् जातीयवाद यांचा आखाडा बनू नयेत !

श्री अंबाबाई भक्त समितीच्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठांची मागणी

श्री उत्तरेश्‍वर मंदिर येथे झालेल्या बैठकीत सहभागी असलेले हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसह विविध संघटना आणि पक्ष यांनी श्रीपूजकांना हटवण्याच्या कारणावरून आंदोलन चालू केले आहे. मंदिरात असे वाद होऊ नयेत म्हणून पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वेळोवेळी पुढाकार घेऊन श्रीपूजक आणि आंदोलक यांच्यात योग्य वेळीच समेट (समन्वय)  घडवला असता, तर मंदिराची युद्धभूमी आणि आई श्री महालक्ष्मीदेवीची विटंबना झाली नसती. श्रीपूजक आणि आंदोलक यांनी आपापल्या कामांची आचारसंहिता पाळावी, तसेच नेहमीच भ्रष्टाचाराच्या आरोपात असणार्‍या देवस्थान समितीने स्वतःपासून सुधारणा करत मंदिराची अपकीर्ती होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, अशी मते श्री अंबाबाई भक्त समितीच्या वतीने घेण्यात आलेले बैठकीत हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केली. गंगावेसमधील श्री उत्तरेश्‍वर मंदिरात २१ जूनला सायंकाळी ५ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे होते.

मान्यवरांचे मनोगत

१. परधर्मियांनी श्री महालक्ष्मी मंदिराविषयी बोलू नये ! – श्री. संभाजी साळुंखे

श्री महालक्ष्मी मंदिराविषयी वाद उत्पन्न होऊ न देणे देवस्थान समितीच्या हाती होते.  आंदोलक आणि श्रीपूजक यांनी एकमेकांच्या विरोधातील पत्रकबाजी टाळावी. सामाजिक संकेतस्थळाच्या वापराने देवी आणि मंदिर यांची होणारी अपर्कीती थांबवावी. धर्म आणि देव न मानणार्‍या आंदोलकांना या आंदोलनातून बाहेर काढावे. प्रशासनाने बोलवलेल्या बैठकीत योग्य निर्णय घ्यावा. त्यामुळे सामान्य भक्तांना दिलासा मिळेल. ‘पुजारी हटाव’ आंदोलनामध्ये काही परधर्मीय बोलत आहेत. त्यांनी हिंदु धर्माविषयी बोलू नये अन्यथा त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. भूमाता ब्रिगेडसारख्या संघटना कोल्हापुरातील सामाजिक वातावरण दूषित करत आहेत. त्यांना प्रशासनाने वेळीच आवर घालायला हवा.

२. देवीचे पावित्र्य न राखणार्‍यांना योग्य भाषेत उत्तर दिले जाईल ! – श्री. महेश उरसाल

गेल्या ४ दिवसांपासून सामाजिक संकेतस्थळावर एका श्रीपूजकाच्या नावाने जो संदेश फिरत आहे, त्यात देवीची विटंबना करणारी आक्षेपार्ह माहिती वापरण्यात आली आहे. अशा विकृत लिखाणामुळे समाजासह भक्तांमध्ये रोष उत्पन्न होत आहे. देवीचे पावित्र्य न राखणार्‍यांना योग्य त्या भाषेत उत्तर दिले जाईल. आई-मूल या नात्याचे भान नसलेल्या संबंधित संदेश पाठवणार्‍या विकृतांचा पोलिसांनी शोध घ्यावा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्री. महेश उरसाल यांनी केली.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, श्री. सुधाकर सुतार, बजरंग दलाचे  शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, वन्दे मातरम् युथ फेडरेशनचे श्री. अवधूत भाट्ये, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री गोविंद देशपांडे, संजय पाटील, अरुण तिबिले, मयूर तांबे, लक्ष्मण जाधव, प्रमोद सावंत, रमेश साळोखे, श्याम पाटील, राजू जाधव, रवींद्र भोसले, सुनील पाटील, राहुल पाटील, सचिन पाटील, महेश नलवडे, नितीश कुलकर्णी, राजेंद्र सूर्यवंशी आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या वेळी उत्तरेश्‍वर पेठ, तटाकडील तालीम मंडळ आणि उद्यमनगर, पोवारनगर येथील उद्योजक यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

श्री महालक्ष्मी देवीची पूजा श्रीपूजकांनीच करायला हवी ! – श्री. मधुकर नाझरे

देशातील मंदिरे ही राज्यघटनेवर नाही, तर धर्मशास्त्राप्रमाणे चालवली जातात. त्यामुळे देवीची पूजा कोणी करायची, हे धर्मशास्त्रात सांगितले आहे. पंढरपूर येथील बडवे-उत्पात गेल्यानंतर जे शासकीय पुजारी नियुक्त केले आहेत, त्यांना धड पूजाही करता येत नाही. त्यामुळे पंढरपूरच्या मंदिरात बराच गोंधळ झाला आहे. यासाठी श्री महालक्ष्मी मंदिरातून श्रीपूजकांना काढू नये; मात्र त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. मंदिरात श्रीपूजकांनी देवीची पूजा करायला हवी. तसेच धर्म आणि देव मानत नसलेल्या व्यक्ती आणि संघटना यांनी श्रीपूजकांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होण्याचा काडीमात्र संबंध नाही. त्यांना बाजूला ठेवून शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा.

श्री महालक्ष्मी देवीविषयी वादग्रस्त संदेश पाठवणार्‍यांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करणार !

हिंदु मंदिरातील विषयांमध्ये इतर धर्मातील लोक आणि संघटना यांनी नाक खूपसू नये. हा विषय हिंदूंचा असल्याने हिंदू एकत्र येऊन तो सोडवतील. सामाजिक संकेतस्थळावर श्री महालक्ष्मीविषयी वादग्रस्त संदेश टाकणार्‍यांच्या विरोधात २ दिवसांत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *