गोरखपूर : येथील गोरखनाथ मंदिराच्या दिग्विजयनाथ स्मृति सभागृहात संत सभा-चिंतन बैठकीत उपस्थित एक सहस्राहून अधिक साधू-संतांच्या समक्ष दुग्धेश्वरनाथ मंदिर, गाजियाबादचे महंत महामंडलेश्वर नारायण गिरी यांनी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात म्हटले होते की, राम मंदिराच्या निर्मितीसाठी उत्तरप्रदेशात एक सशक्त हिंदु मुख्यमंत्री असणे अत्यंत आवश्यक आहे. जो मुख्यमंत्री राममंदिरासाठी सर्व प्रकारच्या त्यागासाठी सिद्ध असेल.
प्रस्तावाला अनुमोदन देतांना साधू-संतांनी भाजपाचे खासदार गोरक्षपिठाधीश्वर महंत योगी आदित्यनाथ यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. येथे आयोजित करण्यात आलेल्या या संत सभा-चिंतन बैठकीत रामजन्मभूमीवर राममंदिरचे निर्माण, धर्मांतर रोखण्यासाठी कायदा बनवणे, समान नागरीक संहिता लागू करणे, गोहत्येवर संपूर्ण प्रतिबंध लावणे आणि गंगा नदीची स्वच्छता आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
गोरक्षपिठाधीश्वर आणि खासदार महंत आदित्यनाथ म्हणाले की, संत राष्ट्र जागृतीचा भाग बनले पाहिजेत. हिंदु समाजाच्या रक्षणासाठी ते शस्त्र आणि शास्त्र यांचे वाहक बनले पाहिजेत. त्यांच्या एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात सोटा असला पाहिजे. हिंदूंना संघटित केले पाहिजे. ज्या दिवशी हिंदू एकतेच्या सूत्रात बांधला जाईल त्या दिवशी सत्ता त्याच्यासाठी दासी होईल. त्या वेळी संत आज्ञा देतील आणि सत्ता त्याचे पालन करील. संतांनी गावांकडे लक्ष दिले पाहिजे. गोरक्षपीठ अशा संतांच्या सोबत आहे आणि पुढेही राहील. मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची चर्चा ही संतांची भूमिका आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात