अन्य धर्मियांच्या परंपरा जपण्यासाठी हिंदु धर्मियांवर बळजोरी नको ! – हिंदुत्वनिष्ठांची ‘बचपन’कडे मागणी
कराड : महाराष्ट्र ही साधू-संत, देवता-राष्ट्रपुरुष यांची भूमी आहे. हिंदु धर्मासाठी अनेकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात कोणाच्या तरी कल्पनेतून धर्मकार्य डावलणारी घटना घडत आहे. तरी या वृत्तीचा नायनाट करून सहकार्य करावे, असे निवेदन हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने ‘बचपन’चे अध्यक्ष संजय जाधव यांना देण्यात आले. ‘बचपन’या प्ले स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुसलमान धर्मियांची वेशभूषा करून येण्यास सांगण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले. त्या वेळी सर्वच हिंदुत्वनिष्ठांनी अन्य धर्मियांच्या परंपरा जपण्यासाठी हिंदु धर्मियांवर बळजोरी नको, अशी जोरदार मागणी केली. (हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात संघटितपणे कृती करणार्या सर्वच हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
या वेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रांताध्यक्ष श्री. विनायक पावसकर, सर्वश्री अजय पावसकर, राहुल यादव, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. सागर आमले, श्री. सागर ढवळे, धर्मजागरण सातारा जिल्हा समन्वयक श्री. गणेश महामुनी, भाजपचे श्री. गणेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री मदन सावंत आणि मनोहर जाधव उपस्थित होते.
‘बचपन’ या ‘प्ले स्कूल’मधील मुलांना पुढील संदेश पाठवण्यात आला होता. शाळेत २४ जून या दिवशी रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने शाळेतील मुलांनी मुसलमान मुलगा/मुलगी यांची वेशभूषा करून यावी. येतांना आपल्या मित्रांना देण्यासाठी काहीतरी गोड आणि एक फूल घेऊन यावे, असे त्या संदेशात नमूद करण्यात आले आहे. (याचप्रकारे श्री गणेश चतुर्थीला सर्वांनी टिळा लावून यावे, तसेच हिंदु परंपरेनुसार पोषाख करून यावा, अशी सूचना बचपन प्ले स्कूल करेल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात