काबूल : अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतामध्ये शनिवारी रात्री ‘सलमा’ धरणावर तालिबान्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १० पोलिसांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी ४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी दहशतवाद्यांनी ‘सलमा’ धरणाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस चौकीवर हल्ला केला, त्यानंतर धरणाला लक्ष्य केले. दहशवाद्यांनी केलेल्या गोळीबारात १० पोलिसांचा मृत्यू झाला असून, ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. या हल्ल्याबाबत तालिबानकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हिंदुस्थानच्या सहकार्याने बनवण्यात आलेल्या ‘सलमा’ धरणाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या हस्ते जून २०१६ मध्ये करण्यात आले होते. त्यानंतर या धरणाचे नाव बदलून हिंदुस्थान-अफगाणिस्तान ‘मैत्रीचे धरण’ असे करण्यात आले होते.
संदर्भ : सामना