फोंडा : हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सदस्यांनी गोवा सरकार अन् पुरातत्व खाते यांनी हातकातरो खांबाच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याच्या पाश्वभूमीवर गोवा क्रांतीदिनी हातकातरो खांबाच्या (inquisition pillar) भोवती मानवी साखळी बनवून या ऐतिहासिक खांबाचे संवर्धन करण्याची मागणी केली होती. या वेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या हिंदूंनी पुढील उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
१. हातकातरो खांबाचे योग्यरित्या संवर्धन केले पाहिजे. या भागाला भेट देणार्या १० पैकी केवळ दोघांनाच या खांबासंदर्भात माहिती आहे. – श्री. सौरभ, दुकानमालक (हातकातरो खांबाजवळ त्यांचे दुकान आहे), श्री. लालेश पर्वतकर आणि श्री. चंद्रकांत पाटील (बेळगाव)
२. हा खांब मी गेल्या ७० वर्षांपासून पहात आहे. रस्ता रूंदीकरणासाठी ख्रिस्ती लोक तो काढू पहात आहेत. – श्री. शामीन मडकईकर
३. हातकातरो खांबाचे रूपांतर भव्य स्मारकात झाले पाहिजे. – श्री. साईनाथ नाईक
४. राजकारण्यांमुळे हातकातरो खांबाचे संवर्धन रखडले आहे. – श्री. जगन्नाथ
५. हातकातरो खांबाची माहिती असलेला फलक खांबाच्या ठिकाणी लावला पाहिजे. – डॉ. राजाराम नाईक
६. हातकातरो खांबाच्या संवर्धनासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केले, ही एक चांगली गोष्ट आहे – श्री. अवघेश विश्वकर्मा
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
ऐतिहासिक हातकातरो खांबाजवळ कचर्याचे साम्राज्य !
जुने गोवे : येथील प्रसिद्ध हातकातरो खांबाजवळील हमरस्त्याच्या बाजूने कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांनी टाकलेला कचरा रस्त्यावर इतस्तत: पसरला आहे, तसेच कचर्यामुळे रस्त्यावर दुर्गंधीही येत आहे. खराब झालेल्या काही गाड्याही तिथेच पडून असून संबंधितांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी शासन सत्तेवर आल्यावर देशभरासह गोव्यातही स्वच्छ भारत अभियानाला मोठ्या दिमाखाने प्रारंभ करण्यात आला आणि कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात आली; मात्र हातकातरो खांबाजवळील हमरस्त्याच्या बाजूने असलेले कचर्याचे साम्राज्य पाहिल्यानंतर हे अभियान कितपत यशस्वी झाले, याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गोवा हे पर्यटन क्षेत्र असल्याने जुने गोवे बगलमार्गाद्वारे फोंडा-पणजी हमरस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते, तरीही हातकातरो खांबाजवळील परिसराची स्वच्छता राखण्याकडे जुने गोवे पंचायत प्रशासन, तसेच राज्यशासन यांचे दुर्लक्ष होत आहे. याकडे संबंधितांनी तात्काळ लक्ष देऊन परिसराची स्वच्छता करावी, असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.
ऐतिहासिक स्थळांविषयी शासनाची उदासीनता का ? – डॉ. मनोज सोलंकी, राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या हातकातरो खांबाच्या संवर्धनाच्या संदर्भात राज्यशासन उदासीन आहे आणि यात भर म्हणून या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. हा प्रकार दुर्दैवी आहे. याकडे पंचायत प्रशासन आणि राज्यशासन यांनी तात्काळ लक्ष देऊन कृती करावी, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात