संभाजीनगर (आैरंगाबाद) – राज्यात आता आध्यात्मिकतेचे धडे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून दिले जाणार आहेत. पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमही राज्य सरकारने तयार केला असून येत्या काही दिवसांत राज्यातील एक हजार अंगणवाडय़ांमध्ये रामायण व महाभारताच्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत.
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे आयोजित विभागीय बैठकीत ही माहिती दिली. औरंगाबाद येथे वार्षिक आर्थिक नियोजनाच्या विभागीय बैठकीत त्या बोलत होत्या. राज्यातील अंगणवाडी व बालवाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा अभ्यासक्रम तसा आखून दिला नव्हताच. परिणामी ज्याला जे वाटेल तसे शिक्षण दिले जात होते. या अनुषंगाने लातूरच्या जगन्नाथ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल केली आहे. त्यामुळे अभ्यासक्रम आखणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. आता हा अभ्यासक्रम तयार झाला असून, लवकरच तो जाहीर होणार आहे.
अभ्यासक्रमातील काही भाग अध्यात्माशी संबंधित असावा, असा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आग्रह होता. परिणामी काही अंगणवाडय़ा डिजिटल करून त्यात रामायण व महाभारतातील काही कथा अंगणवाडीतील मुलांना शिकवल्या जाणार आहेत.
स्त्रोत : लोकसत्ता