काँग्रेसचे सरकार जाऊन ३ वर्षे उलटल्यानंतरही सीमेवरून गोतस्करी केली जाते, हे केंद्र सरकारला लज्जास्पद होय ! केवळ कायदे करून गोहत्या किंवा गोतस्करी थांबत नाही, तर त्यासाठी कृती करावी लागते, हे सरकारला कधी कळणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
१. या चित्रफितीमध्ये दाखवल्यानुसार गाय आणि वासरू यांचे पाय बांधले जातात आणि मग त्यांना पाण्यात ढकलण्यात येते. या वेळी गायीची मान केळ्याच्या खांबांना बांधली जाते. त्यामुळे तिचे तोंड पाण्याबाहेर रहाते. त्यामुळे तिचा मृत्यू होत नाही. त्यानंतर तोंडावर कचरा टाकला जातो. लांबून पहातांना नदीतून कचरा वाहात आहेत, असे दिसून येते. प्रत्यक्षात गाय जात असते.
२. आसाममधील धुबडी जिल्ह्यातील झापसाबारी भागातून अशा प्रकारची गोतस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. या गायींची ओळख पटावी म्हणून काही संकेत तिच्यावर छापले जातात. बांगलादेशमध्ये गाय पोहोचल्यावर तेथील गोतस्कारला तिची ओळख पटते. अशा प्रकारे येथून प्रतिदिन ३००-४०० गायींना बांगलादेशमध्ये पाठवण्यात येते. या गायींना भारतातील उत्तरप्रदेश, बिहार आणि हरियाणा येथून सीमेवर आणले जाते. या गायींना आसाम आणि बांगलादेशमधील व्यापारी खरेदी करतात.
३. गोतस्करांकडून गायींवर केल्या जाणार्या अत्याचाराला स्थानिकांकडून विरोध होऊ लागला आहे; मात्र गोतस्कर त्यांना दाद देत नाहीत. गोतस्कर सीमा सुरक्षा दलालाही विरोध करत असतात. लोकांचे म्हणणे आहे की, सध्या येथून होणार्या गोतस्करीमध्ये वाढ झाली आहे. वर्ष २०१४ आणि वर्ष २०१५ मध्ये सीमा सुरक्षा दलाने ३४ गोतस्करांना ठार केले होते.
४. देशातून प्रतिवर्षी साडेतीन लाख गायी बांगलादेशमध्ये चोरट्या मार्गाने पाठवण्यात येतात. या गोतस्करीचा वार्षिक व्यवहार १५ सहस्र कोटी रुपयांचा आहे. भारत ६५ सहस्र रुपयांची गायीची किंमत बांगलादेशमध्ये १ लाख रुपये होते. बांगलादेशातील गायींची मागणी मोठी असल्याने मोठ्या प्रमाणात गोतस्करी केली जाते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात