श्री महालक्ष्मी मंदिर वादप्रकरणी शासननियुक्त समितीत नास्तिकवादी आणि पुरोगामी नको !
कोल्हापूर : श्री महालक्ष्मी मंदिरातील वाद मिटवण्यासाठी शासननियुक्त समितीमध्ये देवीवर श्रद्धा असणारे, धार्मिक क्षेत्रातील अभ्यासक, तसेच देवीभक्तांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात यावा. या समितीमध्ये जातीयवादी, नास्तिकवादी आणि पुरोगामी मंडळी यांचा समावेश करण्यात येऊ नये. या गोष्टींचा गांभीर्याने विचार न केल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर उतरून याचा विरोध करतील, अशी चेतावणी २८ जूनला श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आली. या वेळी तहसीलदार श्री. दिलीप सावंत यांनी जिल्हाधिकार्यांरच्या वतीने हे निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांमध्ये श्री. संभाजी साळुंखे, श्री. शरद माळी, श्री. किरण कुलकर्णी, श्री. प्रमोद सावंत, श्री. सुनील पाटील, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे श्री. मधुकर नाझरे, श्री. शिवानंद स्वामी, तसेच श्री. बाबासाो भोपळे हे उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की,
१. येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले श्री महालक्ष्मी मंदिर कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या ३ आठवड्यांपासून या मंदिरातील वादाचा आधार घेऊन येथे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे येथे येणार्याल भाविकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२. या मंदिरातील श्रीपूजकांनी श्री महालक्ष्मीदेवीला ‘घागरा-चोळी’ नेसवल्यानंतर वाद निर्माण झाला. या गोष्टीचा करावा तेवढा निषेध अल्पच आहे. परंपरागत चालत आलेली वेशभूषा पालटून श्रीपूजकाने श्री महालक्ष्मीदेवीला ‘घागरा-चोळी’ ही वेशभूषा करून भक्तांच्या भावनाच दुखावल्या आहेत. या गोष्टीसाठी संबंधित पुजार्यांरवर कारवाई झाली पाहिजे. याविषयी सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ही भूमिका घेतलेली आहे; मात्र या घटनेचा लाभ घेऊन देव-धर्म न मानणारी काही मंडळी स्वतःचा पुरोगामी, नास्तिकवादी आणि परंपरांना छेद देणारा ‘अजेंडा’ राबवू पहात आहेत.
३. कोल्हापूर येथील मंदिरातील वाद मिटवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करून त्याद्वारे ३ मासांत श्रीपूजकांचे हक्क आणि अधिकार यांविषयी अहवाल शासनाच्या विधी अन् न्याय विभागाला पाठवला जाईल, असे घोषित केले आहे.
४. या अनुषंगाने ज्यांचा धर्म आणि देवता या विषयांचा अभ्यास नाही, तसेच ज्यांची देव-धर्म यांवर श्रद्धाही नाही, असे काही नास्तिकतावादी आणि पुरोगामी या समितीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.
५. हे नास्तिकतावादी बैठकीत वाद निर्माण करून प्रसिद्धीमाध्यमांद्वारे ते सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करून जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. आपण स्वतः उपस्थित असलेल्या बैठकीत या विरोधी विचारसरणीच्या मंडळींनी श्रीपूजक अजित ठाणेकर यांना केलेली मारहाण हा याचा पुरावाच आहे. त्यामुळे तुम्ही (जिल्हाधिकार्यांनी) या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास आणि त्यावरून पुढे कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी तुम्हीच उत्तरदायी असाल, अशी आम्ही सूचना देत आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात