जयपूर (राजस्थान) : भारतीय जनता पक्षाने राममंदिर उभारण्याच्या सूत्रावर मला सहकार्य केल्यानेच मी त्यांच्यासमवेत आहे. अयोध्येत राममंदिर उभारण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नसून मंदिरउभारणी करूनच आम्ही २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवू, असा विश्वास भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी व्यक्त केला.
अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मुसलमानांनी मनाचा मोठेपणा दाखवून मंदिर उभारणीसाठी पुढाकार घेणे, लोकसभेमध्ये प्रस्ताव मांडणे किंवा सोमनाथ मंदिराप्रमाणे राममंदिराची उभारणी करणे, असे चार मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
खातीपुरा येथे एका खाजगी दौऱ्यानिमित्त साक्षी महाराज आले होते. त्या वेळी एका हिंदी वृत्तपत्राला मुलाखत देतांना ते बोलत होते. उत्तरप्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीविषयी बोलतांना ते म्हणाले, तेथे कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे, जातीयवाद आणि वंशवाद यांवर नियंत्रण ठेवणे आदी प्रमुख सूत्रे आहेत. यात राममंदिर उभारणे हेही एक सूत्र असेल; मात्र राममंदिर उभारण्याची निश्चिती द्यावी लागेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात