गेली अनेक वर्षे सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची स्थानिक पोलीस अन् गुप्तचर विभाग यांच्याकडून प्रत्यक्ष भेटून, तसेच दूरभाषवरून त्यांच्या चौकशा करण्यात येत आहेत. साधक आणि कार्यकर्ते यांची वारंवार चौकशी करून आणि त्यांना पुनःपुन्हा तेच तेच प्रश्न विचारून त्रास दिला जात आहे. तोच भाग आता विहिंपच्या संदर्भात होत असेल, तर या देशात आताही काँग्रेसचेच राज्य आहे का, असा प्रश्न निर्माण होतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : गुप्तचर विभाग विश्व हिंदु परिषद, हिंदु हेल्पलाईन आणि इंडिया हेल्थलाईन यांची हेरगिरी करत आहे, असा आरोप विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात गुप्तचर विभागाच्या महासंचालकांना पत्र लिहून याविषयी विचारणा केली आहे. तसेच गुप्तचर विभाग ज्या खात्याच्या अंतर्गत येतो त्या गृह मंत्रालयाने विहिंपच्या कार्यकर्त्यांची क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे.
डॉ. तोगाडिया यांनी पत्रात लिहिले आहे की, गुप्तचर विभागाचे अधिकारी अचानक येथून विहिंप, हिंदु हेल्पलाईन आणि इंडिया हेल्थलाईन यांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारून त्रास देत आहेत. उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र या राज्यांत अशा प्रकारच्या चौकशा करण्यात येत आहेत. याचे आमच्याकडे पुरावे आहेत. संघटनेचे काम कसे केले जाते, त्यांना कोण साहाय्य करते आदी विस्तृत माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे.
या संदर्भात थेट माझ्याकडे माहिती मागण्याऐवजी कार्यकर्त्यांना गुन्हेगार असल्याप्रमाणे त्यांच्याकडे माहिती विचारली जात आहे. या घटना देशात पूर्वी लावण्यात आलेल्या आणीबाणीची आठवण करून देतात.
हिंदू हेल्पलाईनचे कार्य
वर्ष २०१० पासून हिंदू हेल्पलाईन विहिंपकडून चालवण्यात येते. ०२०६६८०३३०० आणि ०७५८८६८२१८१ हे याचे पुण्यातील क्रमांक आहेत. या क्रमांकावर देशभरातील कोणताही हिंदू साहाय्य मागू शकतो. येथून त्याला स्थानिक विहिंप कार्यकर्त्याचा संपर्क क्रमांक दिला जातो. त्यातून संबंधितांना साहाय्य केले जाते.
भारतात मुसलमान नव्हे, तर हिंदूच संकटात !
विश्व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय संयुक्त महामंत्री सुरेंद्र जैन यांनी मुसलमान हेल्पलाईनला विरोध केला होता. त्यावर ते म्हणाले होते की, या देशात मुसलमान नव्हे, तर हिंदूच संकटात आहेत. तमिळनाडूत गेल्या १० वर्षांत २९, तर कर्नाटकमध्ये गेल्या २ वर्षांत १२ हिंदूंची हत्या झाली. हिंदु हेल्पलाईनच्या माध्यमातून हिंदूंना सर्वप्रकारचे साहाय्य केले जाते; मात्र जर सरकारकडून मुसलमान हेल्पलाईन चालू होते, तर त्यातून फुटीरतावादच वाढणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात