सांगली : प्रदूषणाच्या नावाखाली कृत्रिम तलाव, तसेच अन्य अधार्मिक गोष्टींना महापालिका प्रशासनाने महत्त्व न देता गणेशभक्तांना कृष्णा नदीतच मूर्ती विसर्जन करण्यास अनुमती द्यावी. शाडूमातीची मूर्ती अधिकाधिक लोकांनी बसवण्यासाठी महापालिका प्रशासनाने पत्रक काढावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी २८ जून या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे उपायुक्त श्री. सुनील पवार यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. हेच निवेदन महापालिकेचे गटेनेते श्री. किशोर जामदार यांनाही देण्यात आले. दोघांनीही गणेशोत्सवाच्या संदर्भातील बैठकीत हिंदु जनजागृती समितीस विषय मांडण्यासाठी बोलावू, असे आश्वासन समितीच्या कार्यकर्त्यांना दिले.
वर्षभर सांडपाणी, तसेच अन्य गोष्टींमुळे होणारे प्रदूषण पहाता श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते, असा कांगावा काही नास्तिकवादी संघटना करतात. तरी हे अयोग्य असून धर्मशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्ती विसर्जन झाले पाहिजे. महापालिका ठेवत असलेल्या कृत्रिम कुंडामुळे गणेशमूर्तींची विटंबना होते. त्यामुळे कुंडाऐवजी महापालिकेने भाविकांनाच नदीत मूर्तींचे विसर्जन करण्यास आवाहन करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी उपायुक्तांकडे केली.
या वेळी उपायुक्तांनी यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. शर्वरी रेपाळ, कु. प्रतिभा तावरे, सौ. मधुरा तोफखाने, तसेच दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. अजय केळकर आणि नगरसेवक श्री. प्रशांत पाटील उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात