पणजी : सांकवाळ येथे अनधिकृतपणे चालवल्या जाणार्या बिलिव्हर्स केंद्रासंदर्भात तक्रार करणार्या श्री. हरिदास नाईक यांना बिलिव्हर्सच्या गुंडांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. श्री. नाईक यांच्या नातेवाइकांनी आणि स्थानिकांनी वेळीच हस्तक्षेप केला, म्हणून श्री. हरिदास नाईक यांचे प्राण वाचले. या प्रकरणी गुंडांवर कारवाई करायचे सोडून त्या बिलिव्हर्स केंद्रालाच पोलिसांनी संरक्षण पुरवले आहे, हे अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण आहे. या घटनेमुळे सांकवाळ येथे धार्मिक तणाव निर्माण झाला असून हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसेंदिवस बिलिव्हर्सच्या गुंडांची वाढत चाललेली दहशत गोमंतकात धार्मिक अशांतता पसरवत असल्याने बिलिव्हर्स संघटनेवरच बंदी घालावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
या प्रकरणी गेली चार वर्षे सनदशीर मार्गाने स्थानिक पंचायत आणि वेर्णा पोलीस यांच्याकडे श्री. हरिदास नाईक तक्रारी करत होते; तरीही त्यांना कोणी दाद दिली नाही. आतातर त्यांच्यावर प्राणघातक आक्रमणच करण्यात आले. काही दिवसांपूर्वी प.पू. साध्वी सरस्वती यांच्या काही वक्तव्यांवर आक्षेप घेत अनेक निधर्मी संघटना आणि राजकीय पक्ष यांनी गोमंतकात कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न उद्भवल्याचा डांगोरा पिटला होता; मात्र सांकवाळ येथे बिलिव्हर्सच्या गुंडांनी धुमाकूळ घालून एक हिंदु म्हणून श्री. नाईक यांना मारहाण केली, याला दोन दिवस उलटूनही या शांतताप्रेमी (?) राजकीय नेत्यांनी वा संघटनांनी साधा निषेधही केला नाही. एका गोहत्या करणार्याला मारहाण झाली अथवा कोणत्या चर्चवर दगड फेकला गेला, तर संपूर्ण देश डोक्यावर घेतला जातो; मात्र हिंदूंना जिवे मारण्याचा प्रयत्न होऊनही तथाकथित सेक्युलरवादी शांत रहातात, यालाच धर्मनिरपेक्षता म्हणायचे का ? हिंदु संघटनांवर तोंडसुख घेणारे राजकारणी आता का मूग गिळून गप्प बसले आहेत कि त्यांना बिलिव्हर्सच्या गुंडांची भीती वाटते ?
गोव्यातील शांतता बिघडू शकेल, या केवळ शक्यतेने हिंदुत्वनिष्ठ नेते आणि श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावर गेली ३ वर्षे गोवाबंदी केली आहे; याउलट बिलिव्हर्सवाले गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडवण्याचे आणि कायदा हातात घेण्याचे कृत्य वारंवार करत असतांना शासन त्यांना पाठीशी घालत आहे, हे अनाकलनीय आहे. अशा गुंडगिरी करणार्या बिलिव्हर्स संघटनेवर गोव्यात बंदी घालावी आणि तिच्या गुंडांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे अन्यथा हिंदूंना रस्त्यावर उतरावे लागेल, अशी चेतावणीही समितीने दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात