Menu Close

निरपराध साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर औरंगजेबालाही लाजवेल असे पाशवी अत्याचार करणारे आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी !

देहलीतील ‘सुदर्शन’ वाहिनीवरील मुलाखतीत साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून त्यांच्यावरील अमानवी अत्याचारांचे कथन !

  • असे अमानवी अत्याचार करण्याचा अधिकार पोलिसांना कायद्याने आहे का ? नसेल तर हिंदूंच्या श्रद्धास्थानावर विनाकारण आघात करणार्‍या औरंगजेबी वृत्तीच्या दोषी पोलिसांना सरकारने त्वरित कठोर कारवाई करावी !
  • पोलिसांनी असे अत्याचार कधी मौलवी किंवा पाद्री यांच्यावर केल्याचे ऐकले आहे का ? हिंदुबहुल देशात हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आघात करणार्‍या पोलिसांच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवल्यास चूक ते काय?
  • हिंदूंनो, तुमच्या निरपराध संतांचा विनाकारण छळ करणार्‍या रझाकारी वृत्तीच्या पोलिसांच्या विरोधात त्यांचे वरिष्ठ, तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्याकडे तक्रार करा अन् अशा पोलिसांना कायद्याने शिक्षा होईपर्यंत त्याचा सतत पाठपुरावा करा !

वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अनुमाने ८ वर्षांनी जामीन संमत झाला. जामिनावर सुटका झाल्यानंतर देहलीतील सुदर्शन या हिंदुत्वनिष्ठ वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांची त्यांच्या वाहिनीवरील चलते चलते या कार्यक्रमात मुलाखत घेतली. या मुलाखतीत साध्वी प्रज्ञासिंह यांनी कारागृहात त्यांनी अनुभवलेल्या नरकयातना, तसेच आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी पाशवी वृत्तीने केलेले अमानुष अत्याचार, यांविषयीची विस्तृत माहिती दिली. ती माहिती येथे त्यांच्याच शब्दांत देत आहोत. गेल्या काही दिवसांपासून ही मुलाखत यू-ट्यूबद्वारे सर्वत्र प्रसारित होत आहे.

१. खोटे कारण सांगून पोलीस ठाण्यात बोलावून घेणे

श्री. सुरेश चव्हाणके : प्रथम आपल्याला या घटनेची माहिती कधी मिळाली ?

साध्वी प्रज्ञासिंह : याविषयीची माहिती मला तशी उशिरा मिळाली; पण मुंबई येथील आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांचा मला मी रहात असलेल्या माझ्या पूर्वीच्या घरून दूरभाष आला. त्या घरात माझे आई, वडील आणि बहीण हे तिघे जण रहात होते. अधिकार्‍यांनी मला तुमची गाडी कुठे आहे ?, असे विचारले. मी त्यांना सांगितले, मी ती विकली; पण काय झाले ? त्यावर ते म्हणाले, त्या गाडीचा अपघात झाल्याने आम्हाला त्या गाडीविषयी तुमची चौकशी करायची आहे. आपण या. त्यानंतर मी तात्काळ मिळेल त्या गाडीने सूरत येथे पोचले. तेथे गेल्यावर अधिकार्‍यांनी पुन्हा माझ्याकडे गाडीसंदर्भात विचारणा केली. मी त्यांना ती विकली असल्याचे सांगितल्यावर ते म्हणाले, हे तुम्ही मुंबई येथे येऊन आमच्या अधिकार्‍यांना सांगा. मी ठीक आहे, असे म्हणाले आणि मुंबईला गेले. तेथे मी पाहिले की, आमच्या गाडीच्या पुढे आणि पाठीमागे पोलिसांची गाडी होती; पण त्यात एकही महिला पोलीस नव्हती. अधिकार्‍यांनी दुसर्‍या दिवशी सकाळीच माझ्यावर अत्याचार करण्यास आरंभ केला. त्यांनी मला १३ दिवस अवैधरित्या पोलीस कोठडीत ठेवले.

२. साध्वी प्रज्ञासिंह यांना अमानुष मारहाण करणारे पोलीस अधिकारी !

पोलीस मला का मारत आहेत ? मारहाण करण्यामागे कारण काय आहे ? हेसुद्धा मला समजत नव्हते. आधी त्यांनी मारहाण केली आणि मग प्रश्‍न विचारले. त्या वेळी तेथे एकही महिला पोलीस अधिकारी नव्हती. सर्व पुरुष अधिकार्‍यांनी मला मारहाण केली. मला पट्ट्याने पुष्कळ मारायचे. अशा पद्धतीने दिवसरात्र मला मारहाण चालू होती. त्या अवस्थेत २४ दिवस मी त्यांच्या कोठडीत होते. १३ दिवस त्यांनी मला अवैधरित्या ठेवले आणि ११ दिवस त्यांनी न्यायालयाकडून माझी कोठडी मागून घेतली. या दिवसांत मी काहीही खाल्ले नाही. केवळ पाणी प्यायले. त्या अवस्थेत हे अधिकारी मला पुष्कळ मारहाण करायचे. दिवसरात्र मारहाण करून यांनी अत्याचारांचा कहर केला. प्रारंभी त्यांनी शारीरिक त्रास दिले, नंतर अधूनमधून मानसिक त्रास देत. एक स्त्री सहन करू शकत नाही, अशा मर्यादांचे उल्लंघनही या अधिकार्‍यांनी केले. त्यांनी मला इतके मारले की, माझी त्वचा फाटली. मी बेशुद्ध पडले. बेशुद्ध असतांनाच त्यांनी मला रुग्णालयात भरती केले. तेथे माझी भगवी वस्त्रे उतरवून मला दुसर्‍या रंगाचे कपडे घालण्यास दिले. ते काहीच बोलत नव्हते. मला ऑक्सिजन लावले होते. मी ५ दिवस वेन्टिलेटरवर होते. ३ दिवसांनंतर मला दुसर्‍या रूग्णालयात नेण्यात आले. जेणेकरून कोणी माझी माहिती काढू नये. डॉक्टरांनी यांचे ऑक्सिजन काढता कामा नये, असे सांगितले होते; पण त्या अवस्थेतही त्यांनी मला ३ मजले चढायला लावून खोलीमध्ये नेले. त्यांच्यात मानवतेचा अंशसुद्धा नव्हता.

३. साध्वी प्रज्ञासिंह यांनी बॉम्बस्फोट केला नसतांनाही त्यांच्याकडून तसे वदवून घेण्यासाठी अमानुष मारहाण करणे

श्री. सुरेश चव्हाणके : पट्ट्याने मारहाण करणे, सर्व पुरुषांनी मारणे, हे रात्रीही व्हायचे का ?

साध्वी प्रज्ञासिंह : दिवसरात्र व्हायचे. काहीही करून त्यांना माझ्याकडून त्यांना जे हवे ते वदवून घ्यायचे होते. हीच त्यांची मानसिकता होती. त्यांचे म्हणणे होते की, तुम्ही बॉम्बस्फोट केला, हे मान्य करा. मी त्यांना म्हटले, मी बॉम्बस्फोट केला नाही. त्यामुळे मी ते कधीही मान्य करणार नाही. मला बॉम्बस्फोट झाला आहे, याविषयी काहीच माहिती नव्हते. मला माहिती कसे नाही, यावरूनही ते मला मारहाण करायचे.

४. पोलीस अधिकार्‍यांनी साध्वीजींना भूमीवर जोरात आपटणे आणि दिवसरात्र पट्ट्याने मारहाण करणे

श्री. सुरेश चव्हाणके : हे सर्व होत असतांना आपल्या पाठीचे माकडहाड दुखावले गेले का ? किंवा स्पॉन्डीलिसिस किंवा अन्य व्याधी झाल्या का ?

साध्वी प्रज्ञासिंह : नाही. त्यांचे काळा चौकीमध्ये कार्यालय होते. एका अधिकार्‍याच्या खोलीत मारहाण करायचे. मग दुसर्‍या अधिकार्‍याच्या खोलीत नेऊन मारायचे. मला पकडायचे आणि भूमीवर जोरात आपटायचे. (पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या मरणप्राय यातनांचे कथन करतांना साध्वीजींना अश्रू अनावर झाले.) भूमीवर आपटल्यामुळे माझ्या कमरेचा भाग जमिनीवर आणि डोके भिंतीवर आदळलेे जायचे. हे केवळ एकदाच झाले नाही, तर प्रतिदिन दिवसभरात अनेक वेळा होत होते. ही श्रृंखला दिवसरात्र चालू असे. डोके भिंतीवर आदळल्यावर थोडा वेळ मी सुन्न व्हायचे. काही वेळाने पुन्हा पट्ट्याने मारहाण चालू व्हायची. जेव्हा ज्या पट्ट्याने मारहाण करायचे तो पट्टा पुरुष नेहमी वापरतात तसा नव्हता. तो पुष्कळ रुंद आणि पुष्कळ जाड होता. ते तो माझ्या हातावर अशा पद्धतीने मारायचे की, माझे दोन्ही हात सुजायचे आणि काळेनिळे पडायचे. ते एकदाच पट्टा मारून थांबायचे नाहीत. त्यांनी हात समोर करा, असे सांगितले की मी करायचे. त्यानंतर ते पट्ट्याचे फटक्यांवर फटके मारतच रहायचे. त्यामुळे माझे संपूर्ण हात सुजायचे. मध्येच काही वेळ पट्टा मारणे थांबवायचे आणि कागद हातात देऊन तो दाबण्यास सांगायचे. मी कागद दाबू शकले नाही; कारण हात पुष्कळ सूजले होते. बोटही हलवता येत नव्हते. त्यानंतर गरम पाण्यात मीठ घालून त्यामध्ये हात घालायला सांगितले. यानंतर हात मऊ झाल्यावर पुन्हा घंट्याभरातच मारहाण करायला प्रारंभ करायचे.

५. साध्वीजींना अश्‍लील शिव्या देणे

ते इतक्या अश्‍लील शिव्या द्यायचे की, आपण कल्पनाही करू शकत नाही. साध्वींना शिव्या देणे, हा त्यांचा उद्देश होता. माझ्या मनाचे खच्चीकरण करण्यासाठी ते प्रयत्नरत होते.

६. साध्वीजींच्या शिष्याला मारहाण करणे आणि त्याला साध्वीजींना मारहाण करायला लावणे

श्री. सुरेश चव्हाणके : पोलीस अधिकार्‍यांनी तुमच्यावर कोणतीही दया दाखवली नाही ?

साध्वी प्रज्ञासिंह : दया हा शब्दही आपण उच्चारू शकत नाही, असे पोलीस अधिकार्‍यांचे वर्तन होते. माझ्यासह आलेल्या माझ्या शिष्यालाही त्यांनी मारले. पोलिसांनी शिष्याला मारल्यावर तो मोठ्याने ओरडला. मला समोर काय चालले आहे, तेही समजत नव्हते. त्यानंतर पोलीस अधिकारी मला आत घेऊन गेले आणि त्यांनी माझ्यासमोर शिष्याला मारले. मी स्तब्ध होऊन पहात राहिले. शिष्याला मारल्यानंतर मला मारले. मग शिष्याच्या हातात पट्टा देऊन या तुझ्या गुरु आहेत ना ? तू यांना मार, असे सांगितले. सहाजिकच शिष्य कधीही गुरुंवर हात उगारणार नाही. शिष्याने सांगितले की, नाही साहेब, मला सोडा. तुम्ही माझ्याकडून हे का करून घेत आहात ? ते अधिकारी पाशवी वृत्तीचेच होते. त्यांनी तू मार, नाहीतर आम्ही तुला मारू, अशी धमकी शिष्याला दिली. मी शिष्याला म्हटले, तू मला मार. तो माझ्याकडे पहातच राहिला. शिष्याने जरी मारले, तरी तो हलक्या हातानेच मारेल. त्याने मला पट्ट्याने मारले. त्यानंतर अधिकार्‍याने शिष्याकडून पट्टा हिसकावून घेतला आणि त्याला अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली.

७. पोलीस निरीक्षकांनी एकापाठोपाठएक अशी सतत पट्ट्याने मारहाण करणे

श्री. सुरेश चव्हाणके : म्हणजे त्यांच्या घेरावात आपली स्थिती फुटबॉलप्रमाणे व्हायची का ?

साध्वी प्रज्ञासिंह : मला ६ – ७ पोलीस निरीक्षकांनी घेरले होते. यामध्ये एक महिला पोलीसही होती. तिने एकच फटका मारला; पण उर्वरित सर्वांनी मी थकेपर्यंत मारले. त्यांच्या घेराव्यामध्ये मी मध्यभागी असायचे. प्रारंभी एकजण मारायचा, मग दुसरा, त्यानंतर तिसरा, असे सर्व जण मारहाण करायचे. मला सर्वजण मारत असतांना एक पोलीस अधिकारी त्यांना म्हणाले, तुमच्यामध्ये ताकद नाही. तुम्ही काही खाता कि नाही ? यानंतर त्यांनी शर्टच्या बाह्या वर करून एकाचा पट्टा घेतला आणि मी हिला पहातो, असे म्हणत मला जोरजोरात मारू लागले. ते मारहाण करून थांबले, तोपर्यंत इतरांनी मारहाण करणे चालू केले. आपल्यासामेर एक मानवी देह आहे किंवा स्त्रीदेह आहे, याचे त्यांना तीळमात्रही भान नव्हते.

८. साध्वी प्रज्ञासिंह यांना इतर कैद्यांसमोर अश्‍लील ध्वनीमुद्रण ऐकवणे

साध्वी प्रज्ञासिंह : त्यापूर्वी पोलीस अधिकार्‍याने मला अटकेतील इतर कैद्यांना एकत्र करून सर्वांनासमोर उभे केले अन् अश्‍लील ध्वनीमुद्रण ऐकवले. लॅपटॉपमध्ये आवाज स्पष्ट आला नाही म्हणून ते संगणकाद्वारे मला ऐकवले. माझी स्थिती अजिबात चांगली नव्हती. मी त्यांना मला उभे रहाणेही शक्य होत नाही. मी बसू शकते का ?, असे विचारले. त्यावर ते म्हणाले, का ? तू विवाहसोहळ्यात आली आहेस का ? तुझे स्वागत करू का ? त्यांनी मला उभेच ठेवले. मी तेथील भिंतीला टेकले माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली होती, तरीही तो दुष्ट वृत्तीचा अधिकारी मला पकडून हलवत होता आणि ते अश्‍लील ध्वनीमुद्रण मला ऐकण्यास सांगत होता. त्यानंतर इतर कैद्यांना आणि मला शिव्या दिल्या अन् माझ्याविषयी वाईट गोष्टी बोलला. हे सर्व असह्य होते.

९. चाचण्यांत गुन्हा सिद्ध व्हावा म्हणून अनेकदा त्याच त्याच चाचण्या करणे

श्री. सुरेश चव्हाणके : तुमच्या नार्को टेस्ट, पॉलीग्राफी टेस्ट इत्यादी चाचण्यांविषयी काय झाले ? इतके मारल्यानंतरही त्यांना चाचण्यांची आवश्यकता भासली ?

साध्वी प्रज्ञासिंह : इतकी मारहाण होऊनही जी व्यक्ती जेवत नाही; त्या व्यक्तीच्या पोटात काही नाही, तिच्या चाचण्या करण्यात आल्या. माझी नार्को टेस्ट ३ वेळा, पॉलीग्राफी टेस्ट ३ वेळा, ब्रेन मॅपिंग टेस्ट ३ वेळा आणि सायकलॉजिकल टेस्ट ३ वेळा करण्यात आल्या.

१०. साध्वीजींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे आणि शिव्या देणे

साध्वी प्रज्ञासिंह : मला दिवसभर जुलाब होत होते. माझ्या शारीरिक स्थितीविषयी पोलिसांनी जराही दया दाखवली नाही. परिणामी आज मला चालणे, फिरणे, स्वतःची दैनंदिन कामे करणेही कठीण झाले आहे. आतंकवादविरोधी पथकाच्या (एटीएस्च्या) पोलिसांना माहिती आहे की, एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याने तिचे खच्चीकरण होईल. तिच्यात आत्मबळ रहाणार नाही. तिचा आत्मविश्‍वास संपून जाईल. यासाठी त्यांनी माझ्यावर इतक्या प्रचंड प्रमाणात अत्याचार केले गेले. माझ्या चारित्र्यावर जितके आरोप करता येतील, तितके केले. याशिवाय मला जितक्या अश्‍लील शिव्या देता येतील तेवढ्या दिल्या.

व्यक्तीगत अत्याचारांसाठी मी संबंधित पोलीस अधिकार्‍यांना क्षमा करीन; पण समाज आणि राष्ट्र यांसाठी क्षमा करणार नाही ! – साध्वी प्रज्ञासिंह

श्री. सुरेश चव्हाणके यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना त्यांच्यावर अन्याय करणार्‍यांची चौकशी करण्याची, तसेच त्यांना शिक्षा करण्याची मागणी करणार का, असे विचारले. त्यावर साध्वी प्रज्ञासिंह म्हणाल्या, अशी मागणी मी निश्‍चितच करीन. मी एक संन्यासी आहे आणि तेच माझे जीवन आहे, हे मी कधीही विसरत नाही. संन्यासी नेहमी क्षमाशील करतो. काहीही असो, माझ्या व्यक्तीगत गोष्टीविषयी कोणी केले असेल, तर ते क्षम्य आहे. त्यांनी माझ्या शरिराला यातना दिल्या आहेत. शक्य त्या माध्यमातून माझ्यावर अत्याचार केले. तरीही मी त्यांना क्षमा करते. तथापि कायद्याचा आधार घेत त्यांनी अवैध कामेही केली आहेत. त्यासाठी त्यांना देव निश्‍चित शिक्षा देईल.

ईश्‍वराने गुन्हेगार पोलिसांना शिक्षा केलेली आहे !

जे आता हयात नाहीत, त्यांना शिक्षा झालेलीच आहे. ईश्‍वराने त्यांना सव्वा मासातच माझ्यासमोरून दूर नेले. या व्यतिरिक्त जे त्या वेळी सत्तेत होते त्यांनाही शिक्षा झाली. मी अटकेत असतांनाच देवाने यांना शिक्षा केली. ईश्‍वरच माझा पालनकर्ता असल्याने मी त्याला सांगते. मग दंड आपोआप मिळतो. दुसरा दंड कायदा देईल. सांगणे माझे काम आहे; पण कायदा त्यांना शिक्षा करील. त्यांनी माझ्यासमवेत जे केले, ते अन्य कुठलीही स्त्री, राष्ट्रभक्त, निरपराध आणि राष्ट्रासाठी समर्पित व्यक्तीच्या संदर्भात होणार नाही, कुठल्याही अवैध कृत्यात सहभागी नसलेल्या अन् कायद्याचे पालन करणार्‍या चांगल्या नागरिकावर कुत्सित भावनांनी अत्याचार करू शकणार नाहीत, तसेच त्याच्याविरोधात कुठलेही षड्यंत्र रचू शकणार नाही, यासाठी मी संबंधित पोलीस अधिकार्‍यांना शिक्षा होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करीन. ज्या अत्याचारांना मी सामोरे गेले त्यासाठी मी त्यांना क्षमा करू शकते; पण समाज आणि राष्ट्र यांसाठी क्षमा करणे, हा अपराध ठरेल.

भारताला विश्‍वगुरु बनवायचे आहे. भारताला पुन्हा पुनर्वैभव प्राप्त करून द्यायचे आहे. माझ्यासारख्या सहस्रो, लाखो साध्वी, राष्ट्रभक्त, बंधू-भगिनी सर्व या राष्ट्रासाठी समर्पित आहेत. माझा प्रत्येक जन्म या राष्ट्रामध्ये व्हावा आणि मी देशभक्त असावे. प्रत्येक जन्मात माझ्याकडून देशसेवा घडावी. प्रत्येक वेळी मी यासाठीच जगावे आणि यासाठीच मरावे. जय हिंदु राष्ट्र !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *