‘आषाढी वारीच्या निमित्तानेे जेव्हा भक्त घरातून भगवान पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने निघतो, तेव्हा पांडुरंग त्या भक्तासमवेतच वारीत असतो. त्यामुळेच वारीमध्ये चालतांनाही एवढ्या कठीण परिस्थितीतही भक्ताला आनंद मिळत असतो. यातून एकप्रकारची साधनाच होते. या साधनेद्वारेच भक्ताला पांडुरंगाचे खरे दर्शन होते. अशा प्रकारे वारीतून न जाता केवळ पैसे देऊन पांडुरंगाचे दर्शन घेणार्यांना हा आनंद प्राप्त होत नाही. त्यामुळे त्यांना पायी वारी करणार्यांना मिळणार्या आनंदाचे महत्त्व लक्षात येत नाही. पायी केल्या जाणार्या पंढरपूरच्या वारीची परंपरा बरीच जुनी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत पंढरीच्या वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ही वारी ज्ञानेश्वरमाऊली आणि अन्य संत-महात्मे यांच्या आत्मशक्तीद्वारेच चालू आहे. या वेळी ‘श्रीक्षेत्र शेगाव येथून संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीच्या समवेत पंढरपूरला जाणार्या वारीमध्ये हरीणही सहभागी झाले आहे. ते रात्रीच्या वेळी करण्यात येणार्या कीर्तनाच्या वेळीही बसून रहाते’, हे विशेष होय. यावरून ‘वारीतील चैतन्याचे महत्त्व प्राण्यांनाही समजते’, हे लक्षात येते. ‘ते सध्याच्या पुरो(अधो)गाम्यांना का समजत नाही’, याचे आश्चर्य वाटते ?’
– प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.७.२०१७)