श्री अंबाबाई पुजारी हटाव संघर्ष समितीचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना निवेदन
कोल्हापूर : शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर या धर्तीवर श्री महालक्ष्मी मंदिरात तथाकथित हक्कदार श्रीपूजक हटवून तेथे लायक, चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, बहुजन समाजातील सुशिक्षित श्रीपूजकांची पगारी नोकर म्हणून नियुक्ती करावी, यांसह इतर मागण्यांचे निवेदन श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांना ३ जुलै या दिवशी दुपारी १२.३० वाजता देण्यात आले. या वेळी समितीच्या शिष्टमंडळाने याविषयी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव करण्याची मागणी केली. तेव्हा जिल्हा परिषदेचे गटनेते श्री. अरुण नलवडे म्हणाले की, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्याशी चर्चा करून सभेत याविषयी ठराव करण्यात येईल. चर्चेविना सध्या याविषयी निर्णय घेणे अशक्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. निवेदन देतांना माजी महापौर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,
१. श्री महालक्ष्मी देवीला घागरा चोळीचे वस्त्र नेसवल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राज्यातील लोकप्रतिनिधींनी या घटनेचे दायित्व स्वीकारून सार्वजनिक हित आणि धार्मिक श्रद्धा जपण्यासाठी देवीला नेसवण्याकरिता काठापदराची साडी वापरावी. देवीला अन्य कोणते वस्त्र न नेसवण्यासाठी श्रीपूजकांना सक्त ताकीद द्यावी.
२. शासन दरबारी, कागदपत्रात, जाहीर निवेदनात, फलकांवर, रेल्वेला ‘अंबाबाई’ असे नाव देण्यात यावे, असे दोन्ही ठराव करण्यात यावेत.
३. श्रीपूजकांचा कठोर शब्दांत निषेधाचा ठराव करण्यात यावा.
श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रीपूजक हटाव प्रश्नी सरकारचे लक्ष वेधणार ! – अजित पवार
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटावप्रश्नी येत्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत हा प्रश्नि उपस्थित करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात येईल, अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीला दिली. २ जुलैला समितीच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेऊन अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करावा, अशी विनंती केली. त्यावर ‘याविषयी अध्यादेश काढायला लावू, प्रसंगी कायद्यात पालट करण्याविषयी मुख्यमंत्र्यांना विनंती करू’, असेही ते म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात