-
मोहसीन शेख याला दिल्लीत पकडले.
-
‘इसिस’साठी काम करणार्यांपर्यंत पैसे पोहोचवण्याची जबाबदारी
मुंबई : मालवणीतून दीड महिन्यापासून गायब असलेला इसिसचा संशयित दहशतवादी मोहसीन शेख शुक्रवारी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडला. इतर तिघांसह मोहसीनही डिसेंबर महिन्यात मालवणीतून गायब झाला होता. रिक्षावाला असलेला मोहसीन इसिसचा फायनान्सर असून इसिसमध्ये सामील होणार्या तरुणांपर्यंत पैसे पोहचविण्याची जबाबदारी मोहसीनकडे होती. अशी माहिती दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त अरविंद दीप यांनी पत्रकार परिषदेत दिली. हरिद्वार येथील अर्धकुंभमेळ्यात दहशतवादी हल्ल्याचा कट रचणार्या मोड्युलमध्ये मोहसीन याचाही समावेश असल्याचे दीप यांनी सांगितले.
मालवणीतून डिसेंबर महिन्यात मोहसीन शेख याच्यासह अय्याझ सुलतान, वाजीद शेख आणि नूर मोहम्मद हे चौघे गायब झाले. नूर आणि वाजीद परतले, अय्याझ हा काबूलपर्यंत पोहचल्याचे एटीएसच्या तपासातून उघड झाले आहे. नवी दिल्लीतील कश्मिरी गेटजवळून शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी मोहसीन शेख याला अटक केली. हरिद्वार येथील अर्धकुंभ मेळाव्यादरम्यान घातपात घडविण्याचा कट रचणार्या चौघांना उत्तराखंड येथून याआधी अटक करण्यात आली. या चौघांपैकी अखलाख यांच्या संपर्कात होता, अशी माहिती विशेष पोलीस आयुक्त दीप यांनी दिली. या चौघांनाही मोहसीन याने प्रत्येकी ५० हजार रुपये दिले होते. मोहसीन याच्याकडे ८५ हजारांची रोकड सापडली असून ती कुठून आणली ? कुणाला द्यायला आणली याबाबत मोहसीन समाधानकारक उत्तर देत नसल्याचे दीप म्हणाले.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी मोहसीन याचा ताबा दिल्यानंतर एनआयएच्या अधिकार्यांनी त्याला न्यायालयात हजर केले. दिल्ली न्यायालयाने मोहसीन याला सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. मोहसीन याच्या अटकेमुळे इसिसच्या अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांची संख्या २१ वर पोहोचली आहे.
व्हॉटस्अॅप, फेसबुक, स्कायपीवरून तो दहशतवाद्यांची भरती करायचा
मोहसीन रिक्षा चालक असला तरी सोशल मीडियाचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण त्याला देण्यात आले होते. ‘सिग्नल’, ‘ट्रिल्लीऑन’, ‘स्कायपे’, ‘व्हॉइसअॅप’ यासारख्या विविध अॅपवरून मोहसीन देशभरातील तरुणांशी आणि इसिसच्या परदेशातील दहशतवाद्यांशी संपर्कात होता. पैसे पुरविण्याबरोबरच नवीन तरुणांना इसिसमध्ये भरती करण्याची जबाबदारी मोहसीन याच्यावर होती. मोहसीनच्या अटकेमुळे अद्यापि गायब असलेल्या अय्याजबाबत धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.
संदर्भ : सामना