अध्यात्माचा ध्वज दाही दिशांना फडकवत आयुष्यभर हिंदु धर्माचा प्रसार करणारे स्वामी विवेकानंद यांच्या ४ जुलै या दिवशी असलेल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने…
‘विवेकानंद रॉक मेमोरियल’ तमिळनाडूच्या कन्याकुमारी शहरात स्थित आहे. वर्ष १८९२ मध्ये स्वामी विवेकानंद कन्याकुमारीत आले होते. एक दिवस पोहत ते या विशाल शिळेवर पोहोचले. या निर्जन स्थानी साधना करून त्यांना जीवनाचे लक्ष्य आणि लक्ष्याच्या प्राप्तीसाठी ईश्वरी मार्गदर्शन मिळाले. यानंतरच पुढील वर्षी अर्थात् वर्ष १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे आयोजित एका परिषदेत ते सहभागी झाले. या परिषदेत मांडलेल्या आपल्या तेजस्वी विचारांतून त्यांनी भारताचे नाव मोठे केले. स्वामी विवेकानंद यांच्या अमर संदेशांना साकार रूप देण्यासाठी वर्ष १९७० मध्ये कन्याकुमारीतील याच विशाल शिळेवर एक भव्य स्मृती भवनाची अर्थात् स्मारकाची उभारणी करण्यात आली. या स्मारकाचे मुख्य द्वार अत्यंत सुंदर आहे. लाल रंगाच्या दगडापासून निर्माण करण्यात आलेल्या स्मारकाची उंची ७० फूट आहे. स्मारकाच्या आत स्वामी विवेकानंद यांची अत्यंत विलोभनीय मूर्ती आहे. ही मूर्ती कांसेची बनली असून तिची साडे आठ फूट उंची आहे. ही मूर्ती पाहून स्वामींचे व्यक्तित्व एकदम सजीव झाल्याचा अनुभव येतो.
(संदर्भ : ‘भारत डिस्कव्हरी डॉट ओआर्जी’ संकेतस्थळ)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात