हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांना यश !
जळगाव : जळगाव जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पा’च्या अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन प्राथमिक शिक्षण विभागाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत केले होते. स्थानिक हिंदुत्वनिष्ठांना याची माहिती मिळताच त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अपकारभार शिक्षणाधिकार्यांच्या लक्षात आणून देत ही ‘कार्यशाळा’ रहित करण्याची मागणी केली. हिंदुत्वनिष्ठांची बाजू समजून घेत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. भास्कर पाटील यांनी या कार्यशाळा रहित करण्याचा आदेश काढला.
१. जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाच्या अंतर्गत प्रत्येत तालुक्यात त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचा आरंभ जळगाव तालुक्यापासूनच ७ जुलैपासून होणार होता.
२. हिंदूंच्या धार्मिक भावना सातत्याने दुखावणार्या हिंदुद्वेषी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या कार्यशाळांचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यशाळांना प्रत्येक जि.प. शाळेतील एका शिक्षकाने उपस्थित रहाण्याचे सांगण्यात आले होते. त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे वक्ते मार्गदर्शन करणार होते. हे संपूर्ण नियोजन सर्व शिक्षा अभियानांअतर्गत करण्यात येत होते.
३. हिंदुत्वनिष्ठांना याविषयी माहिती मिळताच ५ जुलैला शिक्षण विभागाशी संपर्क साधत तेथील अधिकार्यांना अंनिसच्या अपकारभाराची माहिती दिली. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाच्या माध्यमातून या समितीने आजवर कमावलेल्या लक्षावधी रुपयांविषयीची कागदपत्रे, तसेच काही जिल्ह्यात हे प्रकल्प रहित करण्याविषयीचे शिक्षण विभागाचे ठराव, सातारा येथील धर्मादाय आयुक्तांनी अंनिसवर ओढलेले गंभीर ताशेरे असणारी कागदपत्रे, नक्षलवादी संघटनांशी या समितीचे संबंध असणारी माहिती देणारी कागदपत्रे इत्यादी सर्व महत्त्वाची कागदपत्रे शिक्षण विभागातील अधिकार्यांना दाखवण्यात आली.
४. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प या गोंडस नावाखाली हिंदूंच्या देवता, श्रद्धास्थाने, धार्मिक भावना यांना दुखावण्याचे षड्यंत्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत असल्याचे वास्तव शिक्षण विभागाच्या अधिकार्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात या समितीच्या कार्यकर्त्यांवर धार्मिक भावना दुखावल्याविषयी गुन्हे प्रविष्ट करण्यात आल्याविषयीची माहितीही देण्यात आली.
५. अशा वादग्रस्त संघटनेला शिक्षण विभागाने अनुमती कशी काय दिली, असा प्रश्न हिंदुत्वनिष्ठांनी विचारला. ही सर्व माहिती पाहिल्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी तत्परतेने हालचाल करत ५ जुलैलाच सायंकाळी उशिरा सदर कार्यशाळा रहित करण्याची नोटीस काढली.
शिक्षण विभागाला माहिती देण्यासाठी भाजपचे महानगरपालिका गटनेते श्री. सुनील भैया माळी, शिवसेना उपमहानगरप्रमुख श्री. मोहन तिवारी, भाजपचे श्री. भगवान सोनवणे, अधिवक्ता निरंजन चौधरी, धर्माभिमानी श्री. दीपक जोशी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, श्री. सचिन वैद्य आणि श्री. रवींद्र हेंबाडे आदी या वेळी उपस्थित होते.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात