सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवरून (सोशल मीडियावरून) गणेशोत्सवात गोमय (गोबर) गणेशमूर्ती बनवण्याविषयी मोठ्या प्रमाणात प्रसार केला जात आहे. गोमयापासून म्हणजे गायीच्या शेणापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचे पूजन केल्यास लवकर शुभ फलप्राप्ती होते. माती आणि गोबर यांच्यापासून बनवलेल्या मूर्तीमध्ये पंचतत्त्व वास करते, असा प्रसार केला जात आहे; मात्र गोमय आणि गोमूत्र यांपासून बनवलेली श्री गणेशमूर्ती अशास्त्रीय आहे.
१. धर्मग्रंथामध्ये मातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीची स्थापना करावी, असे सांगितले आहे. त्यामुळे श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी मातीपासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचीच स्थापना आणि पूजन केल्यास पूजकाला लाभ होतो.
२. गोमय किंवा गोमूत्र यांमध्ये मुळातच गोमातेचे तत्त्व असते. शास्त्रानुसार एखाद्या वस्तूमध्ये एखादे तत्त्व असेल, तर तिथे दुसरे तत्त्व येत नाही. त्यामुळे गोमातेचे तत्त्व निसर्गत: असलेल्या गोमयात गणेशतत्त्व आकर्षिले जाऊ शकत नाही.
मुसलमान किंवा ख्रिस्ती त्यांच्या धर्मशास्त्रामध्ये कधीही मोडतोड करत नाहीत. ते त्यांच्या धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणेच आचरण करतात. हिंदु मात्र पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली कागदाच्या लगद्याची गणेशमूर्ती, गोमय गणेशमूर्ती अशा अशास्त्रीय कृती करतात. धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार मातीची श्री गणेशमूर्ती केल्यामुळे पर्यावरणाचेही रक्षण होते आणि धर्मशास्त्रानुसारही आचरण होते, हे हिंदूंच्या का लक्षात येत नाही ? पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली काढलेल्या शास्त्रविसंगत पर्यायांमधून पर्यावरण रक्षण तर होतच नाही, उलट शास्त्रविसंगत कृती केल्यामुळे धर्माची हानी होते आणि पापही लागते. ही हानी टाळण्यासाठी आणि धर्मशास्त्रानुसार प्रत्येक कृती होण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे अपरिहार्य आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात