मुंबई : सायलेन्स झोन असो की, अन्य काहीही; कायद्याचा बागुलबुवा करून हिंदूंवरच बंधने आणणे हे खपवून घेणार नाही. कायदे नंतर आले, गणेशोत्सव पूर्वीपासूनच आहे. शिवसेना गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी आहे. गणेशोत्सव दणक्यात साजरा करणारच, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
मंत्रालयासमोरील क ४ या सरकारी बंगल्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या शिवालय या कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. दरवर्षी पावसापाठोपाठ हिंदूंचे सण मग गणेशोत्सव असो, नवरात्रौत्सव असो की दिवाळी वातावरण तापू लागते. रेड अलर्ट जारी होतो, अतिरेकी हल्ल्याच्या सूचना येतात. कायदे आडवे येतात, अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊन सण साजरे करणाऱ्या हिंदूंवरच कायद्याचा बडगा उगारला जातो. यावर सरकार कायमस्वरूपी तोडगा का काढत नाही, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.
गणेशोत्सवावर अनेक बंधने लादण्यात आली आहेत. यासंदर्भात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक होणार आहे. या बैठकीत जर समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर शिवसेना हा उत्सव दणक्यात साजरा करणार, असे त्यांनी बजावले. गणेशोत्सव साजरे करणारे अतिरेकी नाहीत. त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्याशी चर्चा करा. ते चुकत असतील तर त्यांना समजवून सांगा, असे आवाहन त्यांनी केले.
संदर्भ : लोकमत