-
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंढरपूर येथे ‘वारकरी संत संमेलना’चे आयोजन
-
आज पंढरपूर येथे वारकरी ‘भजनी आंदोलन’ करणार !
जे सरकारने स्वतःहून करणे अपेक्षित आहे, त्यासाठी वारकर्यांना आंदोलन करावे लागणे, हे सरकारला लज्जास्पद आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पंढरपूर : मंदिराचे रक्षण करण्यासाठी संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी सर्व भेद विसरून संघटितपणे कार्य करायला हवे. धार्मिक परंपरांशी कोणतीही तडजोड न करता प्रथा, परंपरा, धार्मिक कृती पाळायला हव्यात. तसे होत नसल्याने सरकारने नियुक्त केलेली ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती’ विसर्जित करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘वारकरी संत-संमेलना’त ते बोलत होते. या वेळी वारकरी संप्रदायातील पदाधिकारी, तसेच हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यामुळेच आम्ही सनातनशी जोडले गेलो, याचा अभिमान वाटतो ! ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ
डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले आहे. हे पुरोगाम्यांचे षड्यंत्र आहे. डॉ. तावडे यांनी अत्यंत तळमळीने आणि चिकाटीने हिंदूसंघटनाचे कार्य केले. हिंदु धर्माच्या उत्कर्षासाठी कठोर परिश्रम घेणारे डॉ. तावडे यांना त्यांनी न केलेल्या गुन्ह्यासाठी पुरोगाम्यांच्या अट्टहासापोटी कारावास सोसावा लागणे, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. डॉ. तावडे यांनीच आम्हा सर्वांना सनातनशी जोडले, याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. डॉ. तावडे यांची लवकरात लवकर मुक्तता व्हावी आणि ते निर्दोष आहेत, हे सर्व जगाला कळावे, यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ‘आज हिंदुत्वाच्या कार्यासाठी त्यांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची उणीव भासते’, असे सांगतांना ह.भ.प. जवंजाळ महाराज यांचा कंठ दाटून आला होता.’
ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ पुढे म्हणाले,
‘‘आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक राजकीय नेते पंढरपूरला आले होते. त्या वेळी वारकर्यांनी ‘मंदिर समिती बरखास्त करावी’, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत आणि मंत्रीमंडळातील अन्य सदस्य यांच्याकडे केली होती. यावर त्या सर्वांनी ‘मंदिर समितीच्या बरखास्तीविषयी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ६ जुलैपर्यंत सरकारचा निर्णय कळवू’, असे आश्वासन दिले होते. तथापि ते पाळले नाही. याच्या निषेधार्थ ८ जुलै या दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत महाद्वार येथे वारकर्यांच्या वतीने ‘भजनी आंदोलन’ करण्यात येणार आहे. शासन विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभाराविषयी उदासीन असून जोपर्यंत ही समिती बरखास्त होत नाही, तोपर्यंत वारकरी संप्रदाय कोणतेही सरकारी सत्कार स्वीकारणार नाहीत.’’
हिंदु जनजागृती समितीचे पंढरपूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे यांनी या ‘वारकरी संत संमेलना’चे प्रस्ताविक केले. या संमेलनात इतर मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार पुढीलप्रमाणे . . .
हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी मंदिर समिती हवी ! – ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री, संस्थापक-अध्यक्ष, वारकरी प्रबोधन महासमिती
पालखी सोहळा हा समस्त हिंदूंचा आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सहभागाला विरोध होणे दुर्दैवी आहे. याविषयी पालखी सोहळा प्रमुखांची भूमिका नमेकी काय आहे, हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपाखाली अटक केली जाते, हे दुर्दैव आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी मंदिर समिती स्थापन व्हावयास हवी. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आचार-विचारांत हवेत.
हरिपाठाविषयी गंधही नसलेल्यांची मंदिर समितीवर नेमणूक ! – भागवताचार्य वा. ना. उत्पात
मंदिर समितीवर नेमलेल्यांना हरिपाठचा साधा गंधही नाही. सरकार अशांची निवड करेल, असे वाटले नव्हते. पालखी सोहळ्यात हिंदुत्वनिष्ठांना अडवले जाणे दुर्दैवी आहे. पालखी सोहळ्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सहभागाविषयी पालखी सोहळा प्रमुखांची भूमिका काय आहे, हे त्यांना विचारावयास हवे.
धर्मावरील आघातांच्या विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी साहाय्य करू ! अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद
राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषद वैध मार्गाने लढा देत आहे. मंदिर सरकारीकरणाच्या विरोधातील याचिका परिषदेने न्यायालयात प्रविष्ट केली आहे. धर्मावरील आघातांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यासाठी लागणारे आवश्यक ते कायदेविषयक साहाय्य हिंदु विधीज्ञ परिषद करील.
देवस्थान समिती देवळांतील चैतन्य वाढवणारी हवी ! – श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरांच्या व्यवस्थापन समित्या या राजकारण्यांचा आखाडा नव्हे, तर देवळांतील चैतन्य वाढवणार्या असायला हव्यात. मंदिर सरकारीकरणासारख्या निर्णयांच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटितपणे आवाज उठवायला हवा. ‘लोकपत्र’चे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांनी ‘तुकोबांसाठीच कोठून, कसे आणि का आले वैकुंठाचे विमान’, या मथळ्याखाली केलेले लिखाण, तसेच हिंदूंच्या धार्मिक यात्रा आणि वारकर्यांची वारी यांविषयी केले जाणारे अश्लाघ्य लिखाण, यांना सनदशीर मार्गाने विरोध करण्याची आवश्यकता आहे.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथील मद्य आणि मांस विक्री बंद करण्याची मागणी
सध्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जागोजागी ‘बिअर बार’ आणि मांस यांची दुकाने थाटण्यात आली असून त्याद्वारे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रकार चालू आहे. या प्रकरामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. याशिवाय नागरिक व्यसनीही बनत आहेत. म्हणून सरकारने श्री क्षेत्र पंढरपूर येथे मद्य, मांस यांचे उत्पादन, साठा, विक्री आणि वाहतूक यांवर १०० टक्के बंदी आणावी अन् पंढरपूरचे पावित्र्य राखले जावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
उपस्थित मान्यवर
ह.भ.प. नरहरी महाराज चौधरी, ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे, ह.भ.प. अनिल महाराज बडवे, ह.भ.प. मारुती तुणतुणे महाराज, ह.भ.प. शुभम महाराज वक्ते, ह.भ.प. मानसिंग महाराज राजपूत, ह.भ.प. बापू महाराज रावकर, ह.भ.प. कृष्णा महाराज अहिरे, ह.भ.प. नितीन महाराज कदम, ह.भ.प. गोविंद महाराज कानगुले, ह.भ.प. आसाराम महाराज बटुळे, ह.भ.प. योगेश महाराज कदम
‘वारकरी संत संमेलना’त संमत करण्यात आलेले ठराव
१. पंढरपूर, देहू, आळंदी आणि पैठण येथील तीर्थक्षेत्रे १००टक्के मद्य-मांस मुक्त करावीत.
२. महाराष्ट्रातील वारीच्या मार्गावरील सर्वच मुख्य शहरांमध्ये वारकर्यांची नियमित सोय व्हावी यासाठी मुख्य शहरांमध्ये ‘वारकरी भवन’ उभारावे.
३. संत, संत-परंपरा, संत-वाङ्मय, तीर्थक्षेत्रे, यात्रा आणि वारकरी परंपरा यांवर अश्लाघ्य लिखाण करणे, निंदा करणे यांवर कठोर कारवाई होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेगळा कायदा करावा.
४. नोटाबंदीच्या काळात दानपेट्यांत नोटांची हेराफेरी करणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी.
५. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अंतर्गत असलेल्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी.
६. महाराष्ट्रात सरकारीकरण झालेली मंदिरे आणि देवस्थाने सरकारमुक्त करून ती भक्तांच्या कह्यात द्यावीत.
मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी समाजाला जागृत केले ! – ह.भ.प. बाबुराव वाघ महाराज
ह.भ.प. बाबुराव वाघ महाराज म्हणाले, ‘‘मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी सनातन संस्थेने आणि हिंदु जनजागृती समितीने दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातून समाजाला जागृत केले. यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. आज विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील नित्योपचार बंद झाले. एकच नैवेद्य श्रीविठ्ठल आणि रुक्मिणीला दाखवण्यात येतो. पोशाख, न्यास आणि मंत्रोच्चार हे सदोष आहेत.’’
समिती विसर्जित न केल्यास विधान भवनावर मोर्चा काढू ! – संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर
पंढरपूर – नवनियुक्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती विसर्जित (बरखास्त) न केल्यास विधान भवनावर मोर्चा काढू, अशी चेतावणी संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी दिली. मंदिर समिती विसर्जित करण्याच्या मागणीसाठी येथे ६ जुलै या दिवशी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. या बैठकीला मानाच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख, विविध वारकरी संघटनांचे अध्यक्ष आणि वारकरी संप्रदायातील अनेक धर्माचार्य उपस्थित होते. या बैठकीत समिती तात्काळ विसर्जित न केल्यास ३ टप्प्यांत आंदोलन करण्याची दिशा ठरवण्यात आली.
१. आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची घोषणा केली. त्यामध्ये राजकीय लोकांचा भरणा अधिक असून त्या व्यक्तींचा वारकरी संप्रदायाशी काडीचा संबंध नाही. शासनाने अभक्ष भक्षण आणि अपेयपान करणारी मंडळी नेमून वारकरी संप्रदायाचा अवमान केला आहे. (मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम ! जे वारकर्यांच्या लक्षात येते, ते सरकारच्या लक्षात का येत नाही ? – संपादक) मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली समिती वारकरी संप्रदायाला मान्य नाही.
२. शासननिर्णयाला विरोध म्हणून पहिले आंदोलन ८ जुलैला श्री विठ्ठल मंदिरासमोरील संत नामदेव पायरी येथे लाक्षणिक भजन आंदोलन म्हणून, तर दुसरे आंदोलन श्रावण मासातील एकादशीला केले जाणार आहे. या दोन्ही आंदोलनाची शासनाने नोंद न घेतल्यास विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार.
३. सध्याच्या समितीत न्यायालयाच्या निर्देशानुसार ज्या आरक्षित जागा भरायच्या आहेत, त्यासाठीचे सदस्यही वारकर्यांमध्ये असून शासनाने सर्वच जागा वारकरी संप्रदायातून भराव्यात.
सहकार्य
‘वारकरी संत संमेलना’साठी भागवताचार्य वा.ना. उत्पात यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय विनामूल्य उपलब्ध करून दिले. याशिवाय श्रीराम हॉटेलचे मालक श्री. श्रीराम गणतुले यांनी उपस्थितांच्या अल्पोपहाराची विनामूल्य व्यवस्था केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात