Menu Close

मशिदीत मुलींशी लैंगिक चाळे करणाऱ्या ८१ वर्षीय इमामला १३ वर्षांचा कारावास

लंडन : मशिदीत कुराण शिकवत असताना लहान मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या आरोपी इमामला ब्रिटनमध्ये १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ८१ वर्षीय मोहम्मद हाजी सिद्दीकी यांच्यावर चार मुलींना चुकीच्या पद्दतीने स्पर्श केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. हा आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. मोहम्मद सिद्दीकी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना आपल्या जवळ बसवत आणि कुराण वाचायला सांगत असे. यावेळी विद्यार्थींनींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे. धक्कादायक म्हणजे हे सर्व तो इतर विद्यार्थ्यांसमोर करत असे.

कार्डिफ क्राऊन न्यायालयाने याप्रकरणी सिद्दीकीची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला निर्णय सुनावला. आरोप आहे की मोहम्मद सिद्दीकी आपल्यासोबत लोखंड आणि लाकडाची छडी ठेवत असे. शिकवत असताना अनेकदा तो विद्यार्थ्यांना मारहाण करत असे. सिद्धीकी गेल्या ३० वर्षांपासूनही जास्त काळापासून मशिदीत कुराण शिकवत होता. न्यायालयाने त्याला एकूण १४ आरोपांमध्ये दोषी ठरवले आहे. यामधील सहा प्रकरणे मुलांना मारण्यासंबंधीत असून, आठ प्रकरणे लैंगिक शोषणासंबंधी आहेत. हे सर्व गुन्हे १९९६ ते २००६ दरम्यान झाले आहेत.

न्यायाधीशांनी सिद्दीकीला १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावताना म्हटलं की, ‘ज्या चार विद्यार्थ्यांनी पुढे येऊन आरोपीविरोधात तक्रार नोंद केली, ते खूपच साहसी आहेत. त्यांनी कोणताही संकोच न बाळगता, आपल्या धार्मिक निर्बंधांना बाजूला ठेवत समोर येऊन आरोपीविरोधात तक्रार केली आणि त्याच्याविरोधातील पुरावेही सादर केले’. न्यायाधीशांनी सिद्दीकाला शिक्षा सुनावताना सांगितले की, ‘याप्रकरणी तुझी वाईट बाजू आमच्यासमोर आली आहे. तू मुलांच्या पालकांचा विश्वासघात केला आहे. आपल्या मुलांना कुराण शिकता यावं यासाठी ते मुलांना तुझ्याकडे पाठवायचे’.

सिद्दीकीने मात्र आपल्यावर लावण्यात आलेले आरोप षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. मशिदीतील इतर सदस्यांनी मिळून आपल्याला या प्रकरणात गोवल्याचा आरोप त्याने केला आहे.

संदर्भ : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *