श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीची चेतावणी
हिंदुत्वनिष्ठांना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद !
कोल्हापूर : येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील सध्याच्या स्थितीविषयी धर्माचार्यांचे मत घेऊन अंतिम निर्णय आणि आचारसंहिता सिद्ध करावी, शिर्डी आणि पंढरपूर येथील मंदिरांच्या धर्तीवर सरकारी पुजारी नियुक्त करण्याविषयी घाईघाईने निर्णय न घेता धर्माचे अभ्यासक, इतिहास संशोधक आणि शंकराचार्य यांची बैठक आयोजित करावी; मात्र केवळ पुरोगामी आणि नास्तिकवादी विचारवंत यांच्या मतांनुसार एकांगी निर्णय घेऊ नये. याविषयी हिंदूंचे धर्माचार्य, इतिहास अभ्यासक, मान्यवर यांच्याकडील पुरावे, त्यांची मते विचारात घ्यावीत अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, अशी चेतावणी ‘श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’च्या वतीने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याशी ७ जुलै या दिवशी दुपारी ३.३० वाजता झालेल्या चर्चेद्वारे देण्यात आली. या संदर्भातील निवेदनही श्री. सुभेदार यांना देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी श्री. सुभेदार म्हणाले की, ‘श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’ने जे काही आपले म्हणणे मांडले आहे, ते सर्व नोंद करून शासनाकडे पाठवण्यात येईल. या वेळी सध्याच्या स्थितीवर निर्णयाच्या संदर्भातील अनेक ऐतिहासिक, पौराणिक प्राथमिक टप्प्यातील दस्तऐवज आणि कागदपत्रे या निवेदनासमवते दिली आहेत, तसेच आवश्यकतेनुसार वेळोवेळी अनेक पुरावे सादर करण्यात येतील, असे विविध संघटनांचे प्रतिनिधी असलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी सांगितले.
समितीचे श्री. सुनील घनवट म्हणाले की,
१. गेल्या ३ आठवड्यांपासून या मंदिरातील वादाचा आधार घेऊन येथे जातीय तणाव निर्माण करून येथील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे येथे येणाऱ्यां भाविकांच्या मनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२. मंदिरातील वादात अन्य धर्मियांना अजिबात घेऊ नये. १२ व्या शतकापासून ‘अंबाबाई कि महालक्ष्मी’ या संदर्भातील अनेक उल्लेख उपलब्ध आहेत. याविषयी शासनाने या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.
३. सामाजिक संकेतस्थळावरून ‘वर्ष १९४८ ची पुनरावृत्ती होईल’, अशी धमकी देणाऱ्यां समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी; कारण आम्ही श्रद्धेच्या आणि धर्माच्या बाजूने वैध मार्गाने लढा देत आहोत. तुम्ही (प्रशासन) ज्या वेळी याविषयी बैठक घेणार, त्या वेळी आम्हालाही बैठकीला अवश्य बोलवावे.
बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष श्री. संभाजी साळुंखे म्हणाले की,
१. ज्यांचा धर्म आणि देवता या विषयांचा अभ्यास नाही, तसेच ज्यांची देव-धर्म यांवर श्रद्धाही नाही, तसेच जे कधी श्री महालक्ष्मी मंदिरात जातही नाहीत, असे काही नास्तिकतावादी अन् पुरोगामी गेल्या काही दिवसांपासून ‘अंबाबाई कि महालक्ष्मी’ असा वाद निर्माण करत आहेत.
२. देवीला नाव कोणते द्यावे, हा खरे तर देवीला मानणाऱ्यां आणि मनोभावे तिची पूजा करणाऱ्यां भाविकांच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. त्यामुळेच या नावातील पालटाचा भाविकांच्या श्रद्धेवर परिणाम होणार आहे.
३. त्यामुळे वेळ लागला, तरी चालेल; मात्र निर्णय योग्य झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. अन्य संघटनांनी कितीही पानी पुरावे दिले, तरी त्यावर निर्णय न घेता मुख्य सूत्रावर लक्ष केंद्रीत करून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा.
बजरंग दलाचे शहरप्रमुख श्री. महेश उरसाल म्हणाले की,
१. येथील अनेक अभ्यासकांनी ‘अंबाबाई कि महालक्ष्मी’ या नावांच्या संदर्भात नि:पक्षपातीपणाने विस्तृत अभ्यास केलेला आहे.
२. त्यांनी या संदर्भातील अनेक प्राचीन शिलालेख, तसेच कागदपत्रे पुरावे म्हणून गोळा केलेली आहेत; मात्र पुरोगामी कागदपत्रे किंवा पुरावे न देता, अशा अभ्यासाला मान्यता दिली जाऊ नये म्हणून येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यापिठाच्या स्वातंत्र्यावर बंधने आणण्यासाठी धमक्या देत आहेत.
३. एकप्रकारे ही दंडेलशाही आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अशा धमक्यांमुळे सत्य इतिहास समाजापुढे कसा आणला जाऊ शकेल ? तसेच पोलीस आणि प्रशासन अशा धमक्यांकडे गांभीर्याने पहात नाही, तसेच संबंधितांवर योग्य ती कारवाई करत नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात