Menu Close

अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला, सात जणांचा मृत्यू

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या बसवर सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून किमान १४ जण या घटनेत जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये सध्या अमरनाथ यात्रा सुरु असून या यात्रेसाठी देशभरातील भाविक मोठ्या प्रमाणात राज्यात दाखल होतात. २९ जूनपासून या यात्रेला सुरुवात झाली होती. सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या भाविकांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून १४ जण या घटनेत जखमी झाले. जखमींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्या बसवर हल्ला करण्यात आला त्या बसची नोंदणी नव्हती अशी माहिती समोर येत आहे. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची आणि बसची नोंदणी केली जाते. नोंदणी केलेल्या बसला सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे दहशतवाद्यांनी याच बसला लक्ष्य केल्याचे उघडकीस आले आहे. हल्ल्याचे वृत्त समजताच महामार्ग बंद करण्यात आला असून सीआरपीएफची अतिरिक्त तुकडीही अनंतनागच्या दिशेने रवाना झाली आहे. बसमध्ये एकूण २० भाविक होते. हे सर्व जण गुजरातचे रहिवासी असल्याचे सूत्रांकडून समजते.

अमरनाथ यात्रेवर यंदा दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला होता. सुरक्षा व्यवस्थेची दक्षता घेण्यात आली असून भाविकांच्या केसालाही धक्का लागणार नाही असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला होता. मात्र त्यानंतरही हा हल्ला झाल्याने सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

स्त्रोत : लोकसत्ता

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *