पुणे : डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन ४ वर्षे होत आली; मात्र त्यांचे मारेकरी अजूनही मिळाले नाहीत आणि सनातनवर बंदी घाला ही नेहमीची कोल्हेकुई अंनिसवाल्यांनी चालू केली आहे. दाभोलकरांच्या हत्येनंतर आजवर सनातनच्या सहस्रो साधकांची आणि आश्रमांची चौकशी होऊनही त्यात एकही पुरावा मिळाला नाही. अन्वेषणाची दिशा भरकटवून स्वतःला हवा तसे अन्वेषण करायला भाग पाडणारे अंनिसवाले आणि तत्कालीन काँग्रेसीच याला उत्तरदायी आहेत. आम्ही पहिल्यापासून सांगत आलो की, दाभोलकरांच्या घोटाळेबाज अंनिसच्या न्यासाची (ट्रस्टची) चौकशी करा; पण आजवर त्या दृष्टीने पोलिसांनी अन्वेषण का केले नाही ? खरेच जर दाभोलकरांचे मारेकरी हवे असतील, तर एकदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या न्यासाची चौकशी कराच. या घोटाळ्यांमध्ये कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत ? कोणाला आर्थिक लाभ झाला ? त्यांचा या हत्येशी संबंध आहे का ? अशा अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी आणि दाभोलकरांच्या खर्या मारेकर्याला पकडण्यासाठी अंनिसच्या न्यासामधील सर्व सदस्य आणि न्यासाच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्वांची चौकशी झाली, तर त्यांच्या हत्येतील काही धागेदोरे निश्चित मिळू शकतील, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे यांनी केले. पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकारसंघामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि गोवंश रक्षा समितीचे श्री. नितीन वाटकर हेसुद्धा उपस्थित होते.
अंनिसचे डॉ. कांकरीया यांनीच इराक-सिरीयात जाऊन इसिसच्या आतंकवाद्यांचे प्रबोधन करावे !
श्री. शंभू गवारे पुढे म्हणाले, अंनिसने काढलेल्या मूकमोर्च्यामध्ये अंनिसचे डॉ. राजेंद्र कांकरिया सनातनवर टीका करतांना म्हणाले होते, इसिसच्या विरोधात सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना रोखले पाहिजे; मग डॉ. कांकरीया यांनीच इराक-सिरीयात जाऊन इसिसच्या आतंकवाद्यांचे प्रबोधन करावे, ही त्यांना विनंती आहे. (अंनिसवाल्यांना इसिसचा एवढा पुळका का ? आतंकवाद थांबण्यासाठी सनातन आणि हिंदु जनजागृती समिती प्रबोधन करत असेल, तर त्याचा अंनिसला एवढा पोटशूळ का ? – संपादक,दैनिक सनातन प्रभात) एकीकडे काश्मीरमध्ये लढणार्या भारतीय सैनिकांना बलात्कारी आणि सैन्यप्रमुखांना गुंड म्हणणारे हे हिंदुत्वनिष्ठांना अतिरेकीच समजणार ! कांकरियांनी पुण्यात केवळ भाषणे न करता काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणार्यांना विवेकीमार्गाने रोखण्यासाठी अंनिसचे एक पथक काश्मीरमध्ये पाठवावे. वैज्ञानिक जाणिवा या प्रकल्पाद्वारे अंनिस हिंदु धर्माविषयी विद्यार्थ्यांमध्ये अढी निर्माण करण्याचेच काम करत होती. दाभोलकर जिवंत असते, तर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटकच झाली असती.
श्री. पराग गोखले म्हणाले, हिंदु जनजागृती समितीने माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिसच्या) न्यासाचा कारभार पहाता त्यावर प्रशासक नेमावा, न्यासामधील घोटाळे पहाता विशेष लेखा परीक्षण (स्पेशल ऑडिट) करावे, न्यासावरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्यामुळे पुन्हा फेरचौकशी करावी, असे अनेक गंभीर ताशेरे सातारा येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी चौकशी अहवालात ओढले आहेत. या अहवालामुळे दाभोलकर परिवाराचा विवेकवादाचा बुरखा फाटला असून त्यांचा घोटाळेबाज चेहरा समाजासमोर आला आहे.
अंनिसचा भोंदूपणा उघड ! – श्री. नितीन वाटकर
गोवंश रक्षा समितीचे श्री. नितीन वाटकर म्हणाले, अंनिसने आतापर्यंत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर अनेक आरोप केले; मात्र आतापर्यंत एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. अंनिसचा रोष हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर आहे. ९ जुलैला दाभोलकर हत्येच्या प्रकरणात अंनिसने काढलेल्या मोर्च्यामध्ये जमात-ए-इस्लामी हिंद ही संघटनाही सहभागी झाली होती. हीच जमात संघटना गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही पिंपरी-चिंचवड परिसरात पशूवधगृह चालू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अंनिसला अशी कट्टर विचारसरणीची संघटना चालते. यावरूनच अंनिसच्या विचारांमध्ये किती भेसळ आहे, हे दिसून येते. यातून अंनिसचा भोंदूपणा उघड झाला आहे. अंनिसने केलेल्या निराधार आरोपांचा आम्ही निषेध करतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात