Menu Close

मुख्यमंत्र्यांनी शनिमंदिरासंदर्भातील भूमिका पुरोगाम्यांच्या दबावाने नको, शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाने घ्यावी ! – हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसची दुटप्पी भूमिका – केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश न देण्याविषयी ठाम, तर महाराष्ट्रात प्रवेशाची मागणी ?

shani-shingnapur

मुंबई : शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशाचा निष्कारण वाद चालू असून त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी, शनिशिंगणापूर मंदिर विश्‍वस्त आणि आंदोलक संघटना यांची बैठक निष्फळ ठरल्याने आता हा विषय मुख्यमंत्र्यांकडे गेल्याचे सांगितले जात आहे. हा विषय स्त्री-मुक्तीचा नसून पूर्णत: धार्मिक असल्याने याविषयी मुख्यमंत्र्यांनी कोणताही निर्णय घेण्याआधी धार्मिक क्षेत्रातील तज्ञांकडून (चार पीठांचे शंकराचार्य, धर्माचार्य, काशी विद्वत परिषद यांच्याकडून) याविषयी मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

केरळ येथील शबरीमला देवस्थानात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सध्या चालू असलेल्या याचिकेविषयी न्यायालयाने तेथील राज्य सरकारला भूमिका विचारली असता, तेथील काँगेस शासनाने १० ते ५० वयाच्या महिलांना मंदिरात प्रवेश नसावा, ही परंपरा चालूच रहावी, असे स्पष्ट प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले आहे. आश्‍चर्य म्हणजे हीच काँग्रेस महाराष्ट्रात महिलांच्या प्रवेशासाठी आग्रही आहे ? शनीशिंगणापूरच्या बाबतीत शनेश्‍वर देवस्थानचे विश्‍वस्त मंडळ, शनीशिंगणापूर ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि लाखो भाविक यांनी ही परंपरा मोडू नये, अशी भूमिका घेतली आहे. नुकतीच याविषयी विशेष ग्रामसभा बोलावून ही परंपरा कायम ठेवण्याचा ठरावही करण्यात आला आहे. त्यामुळे भाविक, ग्रामस्थ आणि विश्‍वस्त मंडळ यांच्या भावना लक्षात घेऊन हिंदूंच्या मतांवर निवडून आलेले भाजप शासन याचा नक्कीच विचार करेल, अशी आशा आहे. गेल्या ४०० वर्षांत मोगल, इंग्रज आणि त्यानंतर आलेल्या काँग्रेसी शासकांनी; तसेच महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेतील कोणत्याही संतांनी या परंपरेला मोडीत काढण्याचा विचार केला नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी शासनाने पुरोगाम्यांच्या दबावाला बळी पडून आपल्या पायावर धोंडा मारून घेवू नये. तसेच त्यांच्या दबावाला बळी पडून कोणताही धर्मविरोधी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेऊ नये, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती करत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *