जळगाव : लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसारमाध्यमांचा आज राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभाग अत्यल्प आहे. केवळ तरुण भारत, सामना, आपला वार्ताहर आणि सनातन प्रभात यांसारखी दैनिकेच या कार्यात सहभागी होतात. आपल्या दैनिकाच्या सहकार्याने सकारात्मक आणि सात्त्विक समाजापर्यंत धर्मकार्य पोहोचण्यास सहाय्य होत आहे. ‘योग: कर्मसु कौशल्यम् ।’ या वचनानुसार आपले काम असल्याने इथे आल्यावर फार छान वाटले. आपल्या साप्ताहिक आरतीच्या या उपक्रमास आमच्याकडून शुभेच्छा आहेत, असे हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी दैनिक तरुण भारतच्या सदिच्छा भेटीच्या वेळी सांगितले.
सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी दत्तात्रेयांची आरती केली. या वेळी समितीचे श्री. प्रशांत जुवेकर आणि सौ. क्षिप्रा जुवेकर यांचा सत्कार वरिष्ठ संपादक श्री. चंदुलाल नेवे यांनी केला. तर दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. रवींद्र हेंबाडे यांचा सत्कार कार्यकारी संपादक श्री. दिनेश दगडकर यांनी केला.
त्यानंतर दैनिक तरुण भारतचे वृत्त संपादक श्री. अमित महाबळ या वेळी म्हणाले, ‘‘सनातनच्या आश्रमात एकदा जाऊन आले पाहिजे. त्यांचे व्यवस्थापन सुयोग्य असे आहे. साधकांच्या मनातील अयोग्य क्रिया प्रतिक्रियांचे प्रसंग फलकावर लिहिलेले असतात. सर्व साधकांचे दैनंदिन नियोजन केलेले असते.’’ त्यानंतर त्यांनी सर्व उपसंपादक आणि कर्मचारी यांचा परिचय करून दिला.
यानंतर तरुण भारतच्या संपादकीय आणि अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांना जळगाव येथील सनातनच्या आश्रमात भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात