पणजी येथील पत्रकार परिषद
पणजी : राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून मूर्तीभंजन आणि धार्मिक चिन्हांची नासधूस करणार्या घटनांत आरोपी म्हणून फ्रान्सिस परेरा याला गोवा पोलिसांनी अटक केल्यानंतर गोमंतकात धार्मिक सलोखा कोण बिघडवत होते, हे स्पष्ट झाले आहे. ‘एकाच देवाला भजा आणि मूर्ती फेकून द्या’, अशी शिकवण देणार्या बिलिव्हर्स किंवा तत्सम वादग्रस्त पंथाशी फ्रान्सिस परेराचे संबंध आहेत का ? याची चौकशी गोवा पोलिसांनी करावी. मागील १२ वर्षांपासून मूर्तीभंजनाच्या प्रकरणावरून सहिष्णु हिंदु संघटनांनाच लक्ष्य करणार्या तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांची तोंडे आता बंद झाली आहेत. त्यामुळे हिंदु संघटनांवर खोटे आरोप करणारे हिंदुद्वेष्टे समाजसेवक, संघटना, राजकारणी, तथाकथित ख्रिस्ती धर्मगुरु यांनी आता जाहीर माफी (कन्फेशन) मागून खर्या अर्थाने पापक्षालन करावे, अशी मागणी गोमंतकातील हिंदु संघटनांच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला या वेळी ‘भारतीय संस्कृती रक्षा मंच’चे श्री. माधव विर्डीकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रविण असोलकर, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते डॉ. मनोज सोलंकी आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांची उपस्थिती होती.
सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले की, गोव्यातील कोणत्याही घटनेशी ‘सनातन’चे नाव जोडण्याचा विडाच काही जणांनी उचलला आहे. त्यात राष्ट्रीय हिंदू अधिवेशनात येऊन गेलेल्या साध्वी सरस्वती यांनाही जोडण्याचा प्रयत्न केला जात होता; मात्र असे प्रकार करणार्यांना आता तोंड दाखवायला जागा शिल्लक नाही. ‘गोवा सिटीझन्स अॅक्शन फोरम’सारख्या तथाकथित संघटनांनी ‘गोव्यातील शांती आणि सलोखा नष्ट व्हावा, म्हणून सनातन संस्थेने या धार्मिक चिन्हांची नासधूस करण्याचा कट रचला आहे आणि याकरता मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गोव्यात आणले आहे’, असा बिनबुडाचा, मानहानीकारक आरोप केला होता. त्यांच्या विरोधात सनातन संस्थेने फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. हिंदु समाज बहुसंख्य असूनही सर्वांशी सहिष्णुतेचे नाते जोपासत आहे; मात्र अल्पसंख्यांकांचे राजकारण करणारे त्यालाच प्रत्येक वेळी दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा प्रकारचे खोटे आरोप करून धार्मिक सलोखा बिघडवणार्यांवरही गोवा शासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी केली.
शासनाने अशी तत्परता १३ वर्षांपूर्वी दाखवली असती, तर मूर्तीभंजनाच्या अनेक घटना घडल्याच नसत्या ! – जयेश थळी, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ
गोमंतकात सुमारे १३ वर्षांपूर्वी अनेक ठिकाणी हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या तोडफोडीच्या घटना घडल्या. त्या वेळी हिंदूंनी या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज उठवला. या आंदोलनानंतर गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ स्थापन होऊन महासंघाच्या नेतृत्वाखाली अनेक मंदिरांच्या विश्वस्तांनी अनेक आंदोलने छेडली. या प्रश्नावर ऐतिहासिक ‘गोवा बंद’ आंदोलनही करून शासनाने या प्रकरणी गुन्हेगारांना तातडीने पकडण्याचे आवाहनही करण्यात आले; मात्र एवढे करूनही शासन गुन्हेगाराला पकडू शकले नाही. सध्या ख्रिस्त्यांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आल्यानंतर आर्च बिशप यांनी आवाज उठवल्यानंतर शासन खडबडून जागे झाले आणि या धार्मिक स्थळांच्या तोडफोड प्रकरणांतील खरा गुन्हेगार फ्रान्सीस परेरा यांना पोलिसांनी पकडले. शासन आणि पोलीस यंत्रणा यांनी १३ वर्षांपूर्वी हीच तत्परता दाखवली असली, तर हिंदूंच्या अनेक श्रद्धास्थांनावर घाव पडले नसते. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड रोखता आली असती.
हिंदु हे सहिष्णु असून ते अशी कृत्ये कधीच करू शकत नाहीत, हे सिद्ध – प्रवीण आसोलकर, स्वराज्य संघटना, म्हापसा
स्वराज्य संघटनेने १० जुलै या दिवशी गोव्यातील धार्मिक स्थळांच्या घटनांमागे ‘बिलिव्हर्स’ संघटनेचा हात आहे का ? यासंदर्भात अन्वेषण करण्याची मागणी केली होती. धार्मिक स्थळांच्या तोडफोडीमागे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा हात असल्याचा आरोप केला जात होता. हिंदु हे सहिष्णु असून ते अशी कृत्ये कधीच करू शकत नाहीत. फ्रान्सीस परेरा याला अटक केल्यामुळे हिंदूंवरील आरोप खोटे ठरले आहेत. आरोपी फ्रान्सीस परेरा यांच्या अटकेनंतर अन्वेषण योग्य दिशेने होऊ लागले आहे.
१. या पत्रकार परिषदेला ६ वृत्तवाहिन्यांचे आणि ६ वृत्तपत्रांचे पत्रकार उपस्थित होते.
२. ही पत्रकार परिषद हिंदु जनजागृती समितीच्या गोवा फेसबूक पेजवर ‘लाईव्ह’ दाखवण्यात आली. फेसबूकवर ही पत्रकार परिषद २ सहस्र ५०० लोकांनी पाहिली, तर ती ४ सहस्र ४१ लोकांपर्यंत पोहोचली. तसेच ‘पेज’चे ६० ‘लाईक’ वाढले. आता ‘पेज लाईक’ संख्या ८९० वर पोहोचली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात