राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या विरोधात संघटितपणे विरोध करणार्या संघटनांचे अभिनंदन ! अशा प्रकारे संघटितपणे विरोध केल्यास कोणीही पुन्हा तसा अवमान करण्यास धजावणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : येथील लायन्स क्लबचे प्रांतपाल (जिल्हा गव्हर्नर) गिरीश मालपाणी यांना क्लबच्या वतीने पेशवा बाजीराव अशी उपाधी देऊन त्यांचा १५ जुलैला गौरव करण्यात येणार होता. या कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि अन्य संघटना यांनी विरोध करण्याचे ठरवताच लायन्स क्लबकडून झालेल्या चुकीविषयी क्षमायाचना करण्यात आली.
१. वरील कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर प्रांतपालांचे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या रूपातील छायाचित्र प्रसिद्ध केले होते. ते पाहून वरील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी कार्यक्रमस्थळी निषेध आंदोलन करण्याचे ठरवले होते आणि त्याचे लिखाण विविध सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित केले होते.
२. लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल राज मुछाल यांनी फाऊंडेशनचे श्री. संदीप खर्डेकर आणि महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी त्यांनी हे प्रकरण उत्साहाच्या भरात आणि अनावधानाने घडले आहे. त्या पत्रिकेद्वारे श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि आम्ही त्यांच्या उत्तुंग कार्याचा आदरच करतो. पत्रिकेतील लिखाणामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी आम्ही क्षमायाचना (दिलगिरी) व्यक्त करतो, असे स्पष्ट करत लेखी पत्रही दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
३. यापुढील काळात कोणत्याही राष्ट्रपुरुषांचा अशा प्रकारे अवमान सहन केला जाणार नाही, असे श्री. खर्डेकर आणि श्री. देशपांडे यांनी आवाहन केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात