मिरज : गणेशोत्सव मंडळांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, तसेच मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवण्यास रात्रीही अनुमती असावी, गणेशोत्सव काळात ११ दिवस मद्यबंदी असावी या मागण्यांसह शहरातील गणेशोत्सव मंडळांचे अन्य प्रश्नही सोडवण्याचा मिरज शहर गणेशोत्सव समिती प्रयत्न करेल, असे मिरज शहर गणेशोत्सव समितीचे निमंत्रक श्री. आेंकार शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सर्वपक्षीय युवा कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून गणेशोत्सव मंडळे आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
समितीचे अध्यक्ष श्री. अभिजित हारगे म्हणाले, गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजवण्याच्या जोडीला गणेशोत्सव मंडळांना अन्य सुविधा देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करू. वेळप्रसंगी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ. श्री. विनायक माईणकर म्हणाले, गणेशोत्सव मंडळांनी लवकरात लवकर मिरवणुका संपवल्या पाहिजेत. या वेळी सर्वश्री सचिन चौगुले, निरंजन आवटी, चंद्रकांत मैगुरे, अशोक कांबळे, जयगोंड कोरे, शितल पाटोळे, शरद सातपुते, संदीप शिंदे, अजिंक्य गवळी यांसह अन्य उपस्थित होते.
शहरात विसर्जनाच्या दिवशी वाहनतळाची सुव्यवस्था करावी, जिवंत देखाव्यांना प्रोत्साहन मिळावे, मंडळांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणी करू नये, गणेशोत्सव काळात ११ दिवस मद्यबंदी असावी, ही समितीची काही उद्दिष्टे आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात