पणजी : जुने गोवे येथील पोर्तुगीज राजवटीतील ‘इन्क्विझिशन’ अत्याचारांच्या वेळी बलीदान दिलेल्या गोमंतकीय हिंदूंच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या ‘हातकातरो’ खांबाच्या दुरवस्थेकडे तत्परतेने लक्ष देऊन त्याचे संवर्धन करू, असे आश्वासन केंद्रीय सांस्कृतिक तथा पुरातत्व खात्याचे मंत्री श्री. महेश शर्मा यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
शिवसेनेचे खासदार श्री. गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच केंद्रीयमंत्री श्री. शर्मा यांची नवी देहली येथे त्यांच्या कार्यालयात भेेट घेऊन त्यांना ‘हातकातरो’ खांबाच्या दुरवस्थेविषयी माहिती दिली. या शिष्टमंडळामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे आणि सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा सहभाग होता. समितीच्या वतीने केंद्रीयमंत्री श्री. शर्मा यांना ‘हातकातरो’ खांबाच्या संदर्भातील निवेदन पुराव्यानिशी सुपुर्द करण्यात आले, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी दिली.
या निवेदनात म्हटले आहे की, १२ व्या शतकातील ‘हातकातरो’ खांब हा अत्याचारी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वित अत्याचारांची साक्ष आहे. पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील हिंदूंवर लादलेल्या ‘इन्क्विझिशन’चा हा एकमेव पुरावा आहे. वर्ष २००६ पर्यंत शासनाच्या कागदपत्रांत उल्लेख असलेल्या हातकातरो खांबाविषयीच्या नोंदी मिटवण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे केला जात आहे. सध्या हा खांब पणजी-फोंडा मुख्यरस्त्यावर एका धोकादायक नाक्यावर रस्त्याच्या मध्यभागी उभा आहे. या खांबाच्या ठिकाणी पाच रस्ते मिळतात आणि ही महामार्गावरील अपघातप्रवण जागा आहे. काही दिवसांपूर्वी एका वाहनाने ठोकर दिल्याने या खांबाचा अर्धा चौथरा तुटला आहे. हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी १८ जूनला गोवा क्रांतीदिनाच्या दिवशी या ठिकाणी आंदोलन करून शासनाकडे या खांबाचे तातडीने संवर्धन करण्याची मागणी केली होती. याला एक मास उलटून गेला आहे; मात्र शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केलेले आहे. हिंदु जनजागृती समितीने यापूर्वीही अनेक वेळा शासनाकडे ‘हातकातरो’ खांबाला प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून ती ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करण्याची मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात