कला मंदिर विद्या प्रसारक मंडळ (भांडुप) च्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन
मुंबई : मंदिरे केवळ देवालये नसून हिंदूंसाठी चैतन्याचे स्रोत आहेत. त्यामुळे त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतिश कोचरेकर यांनी केले. कला मंदिर विद्या प्रसारक मंडळ (भांडुप) च्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर भांडुप येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट या ठिकाणी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचा आरंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. उपस्थित वक्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे मुलुंड जिल्हाध्यक्ष श्री. भाऊ बागवे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री. कोचरेकर पुढे म्हणाले…
१. मुंबईचे श्री सिद्धीविनायक मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर सरकारने आपल्या कह्यात घेतल्यापासून मंदिरातील भ्रष्टाचार आणि अपप्रकार यांमध्ये वाढ झाली आहे.
२. भक्तांना कल्पना न देता कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंंदिरात श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला रासायनिक विलेपन करण्यात आले.
३. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील अनेक मंदिरांतील दागिन्यांचे घोटाळे उघड झाले आहेत.
४. बंगालमध्ये धर्मांधांनी मंदिरांतील मूर्तींची तोडफोड केली; मात्र शासनाकडून त्यावर कारवाई करण्यात आली नाही. श्री सिद्धिविनायक मंदिरात हिंदु भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेला पैसा कणकवली येथील काँन्व्हेंट शाळेला देण्यात आला.
५. शासनाच्या कह्यात असलेल्या मंदिरांमध्ये होणार्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषद कायदेशीर लढा देत आहे. हिंदूंनीसुद्धा संघटितपणे मंदिरांमध्ये यज्ञ, होम-हवन, प्रवचन, भजन, कीर्तन, स्तोत्र पठण, सामूहिक नामजप असे सात्त्विक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करून मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवावे.
ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांची सत्यता लक्षात घ्या ! – श्री. यशवंत कुलकर्णी, ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र तज्ञ
तथाकथित पुरोगामी, बुद्धीवादी आणि निधर्मीवादी हे विज्ञानाच्या नावाखाली ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र थोतांड आहे, असा धादांत खोटा प्रसार करून सामान्य जनतेला फसवतांना दिसतात. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र यांविषयी जगातील अनेक नामवंत विद्यापिठांतून शिक्षण दिले जाते. ऋषीमुनींनी या विषयावर सखोल अभ्यास करून कित्येक भाकिते केली आहेत. ती आज विज्ञानाच्या कसोटीवरसुद्धा सत्य ठरत आहेत. जीवनातील अडचणींवर ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीच्या साहाय्याने उपाय शोधता येतात. उपाय केल्यास जीवनातील दुःखे दूर होऊन आनंदी जीवन जगता येते. वास्तुशास्त्रानुसार वास्तूची रचना केल्यावर वास्तुदोष दूर करता येतात.
योगशास्त्राने जीवन सुखी आणि आनंदी होते ! – श्री. जनार्दन सुतार, योगशास्त्रतज्ञ
योगशास्त्र ही हिंदु संस्कृतीने जगाला दिलेली मोठी देणगी आहे. योग्य पद्धतीने योग केल्यावर अगदी बालवयापासून ते वृद्धावस्थेपर्यंत निरोगी, सुखी आणि आनंदी जीवन जगता येते. आज पाश्चिमात्य देशांत निरोगी आणि सुखी जीवनासाठी योगविद्येचे शिक्षण दिले जाते; मात्र तरुण पिढी पाश्चात्यांच्या विकृतीचा अवलंब करत मद्यपान, धूम्रपान यांच्या आहारी जाऊन रात्रभर ‘डिस्को’ आणि ‘पब’ यांमध्ये जाऊन दिवसा झोपा काढतांना दिसते.
क्षणचित्रे
१. श्री. सतिश कोचरेकर यांंनी मार्गदर्शनाला आरंभ करण्यापूर्वी श्री अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात मृत्यू पावलेल्या हिंदूंच्या आत्म्याला सद्गती मिळावी, यासाठी उपस्थितांकडून ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करवून घेतला.
२. सूत्रसंचालक श्री. गणेश पाटील यांनी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गामुळे समाजात अभिमानाने हिंदु धर्माची माहिती सांगू शकत असल्याचे आणि नियमितपणे राष्ट्र आणि धर्म यांची सेवा केल्याने आनंद मिळत असल्याचे सांगितले. उपस्थित हिंदूंना समितीच्या वतीने घेण्यात येणार्या धर्मशिक्षणवर्गात येण्याचे आवाहन त्यांनी केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात