चीनमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांना आता नास्तिक व्हावे लागणार आहे. सदस्यांनी धर्म न सोडल्यास त्यांना शिक्षेला सामोरे जावे लागेल, असा इशारा पक्षाकडून देण्यात आला आहे. ‘पक्षाची विचारधारा लक्षात घेता सच्चा मार्क्सवादी होण्यासाठी सदस्यांना नास्तिक व्हावे लागेल,’ असे कम्युनिस्ट पक्षाने एका पत्रकातून म्हटले आहे. ‘कम्युनिस्ट पक्षाच्या एखाद्या सदस्याने धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन सुरु ठेवल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे चीन सरकारचे अधिकृत वर्तमानपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.
डाव्या विचारधारेचा कम्युनिस्ट पक्ष कोणत्याही धर्माला मानत नाही. मार्क्सवादी सिद्धांतानुसार कम्युनिस्ट पक्ष स्वत:ला नास्तिक म्हणवून घेतो. चीनच्या संविधानाचा विचार केल्यास, देशातील लोकांना धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र संविधानाने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला असूनही सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने सदस्यांना नास्तिक होण्याचे आदेश दिले आहेत. चीनच्या सत्ताधारी पक्षाचा हा आदेश संविधानाच्या विरोधात आहे.
कम्युनिस्ट पक्षाच्या धार्मिक विषयांसबंधीच्या विभागाचे संचालक वांग जुआन यांनी पक्षाच्या मासिकात ‘नास्तिकतेवर’ भाष्य केले आहे. ‘पक्षाच्या सदस्यांनी कोणत्याही धर्मावर विश्वास आणि श्रद्धा ठेवू नये. हा सर्व सदस्यांसाठी एक इशारा आहे,’ असे मासिकातील लेखात नमूद करण्यात आले आहे. परकीय शक्ती धर्माचा वापर करत चीनमध्ये घुसखोरी करण्याचे आणि देशाच्या सुरक्षेला निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत, असेही मासिकाने म्हटले आहे.
‘कम्युनिस्ट पक्ष सामान्यपणे सर्व धर्मांकडे सहिष्णूपणे पाहतो. मात्र स्वत:च्या सदस्यांना धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन करण्यापासून कम्युनिस्ट पक्षाकडून कायमच आडकाठी केली जाते,’ असे काऊंसिल ऑन फॉरेन रिलेशन्स नावाच्या अमेरिकन थिंक टँकने म्हटले आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे एकूण ९ कोटी सदस्य आहेत. या सदस्यांपैकी धार्मिक संघटनेशी संबंध असलेल्या पक्षाच्या सदस्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार आहे.
स्त्रोत : लोकसत्ता