अमरावती : चिनी वस्तूंची विक्री करून भारतियांच्या परिश्रमाच्या पैशांनी तो देश श्रीमंत होत आहे आणि तोच देश आपल्याला युद्धाची चेतावणी देतो; मात्र तरीसुद्धा आपले शासन त्यावर कुठलीच कारवाई करत नाही, हे चिंताजनक आहे. शासनाने शत्रूराष्ट्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालेपर्यंत आम्ही हिंदुत्वनिष्ठ संघटना देशभरात व्यापक आंदोलन करतच राहू, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित यांनी केले. येथे १७ जुलै या दिवशी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि विविध समविचारी संघटना यांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी समितीच्या सौ. अनुभूती टवलारे, सनातन संस्थेच्या सौ. विभा चौधरी, हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास आणि योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे नेते श्री. प्रवीण हरमकर, देवस्थान सेवा समिती, विदर्भचे सचिव श्री. अनुप जयस्वाल, बजरंग दलचे श्री. निरंजन दुबे, विश्व हिंदु परिषदेचे श्री. सागर खेडकर आणि त्यांचे कार्यकर्ते, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. महेश लढके, श्री. कर्ण धोटे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते असे एकूण ५५ जण उपस्थित होते. आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी श्री. खुशालसिंह परदेसी यांना देण्यात आले.
क्षणचित्रे
१. सतत ३ ते ४ दिवसांपासून अमरावतीत पाऊस पडत होता; मात्र आंदोलनाच्या वेळी पाऊस पडला नाही.
२. आंदोलनापूर्वी प्रार्थना करत असतांनाच काही गायी तेथे आल्या. त्या साधारणतः ५ मिनिटे आंदोलनकर्त्यांकडे पहात होत्या. त्या वेळी ‘गायींच्या रूपात श्रीकृष्णच आशीर्वाद देण्यासाठी आला आहे’, असे काहींना जाणवले.
३. एक धर्माभिमानी निमंत्रण नसतांना स्वतःहून आंदोलनाला उपस्थित होते. ‘अशी आंदोलने ठिकठिकाणी घ्यायला हवीत’, असे ते म्हणाले.
४. नवीन धर्माभिमानी प्रारंभीपासून आंदोलनाच्या सेवेला उपस्थित होते.
५. शिवसेनेचे नेते श्री. प्रवीण हरमकर यांनी आंदोलनाची रचना आणि आयोजन यांचे कौतुक केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात