गृहराज्यमंत्री हंसराज अहिर याना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट
अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वत:हून डॉ. झाकीर नाईक यांच्या फेसबूक खात्यावर बंदी घालणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने येथे गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहिर यांची भेट घेऊन डॉ. झाकीर नाईक यांच्या फेसबूक खात्यावर बंदी घालण्याची मागणी केली. डॉ. झाकीर यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर भारत सरकारने यूएपीए कायद्याद्वारे बंदी घातली आहे. बंदी घातलेल्या संस्थेने प्रचार-प्रसार करणे या कायद्यानुसार गुन्हा आहे. असे असूनही सामाजिक माध्यमांद्वारे डॉ. झाकीर संपूर्ण भारतात प्रचार आणि प्रसार करत आहेत. फेसबूक, टि्वटर खाते आणि अवैध केबल वाहिन्यांच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रसार चालू आहे, हेेे गृहराज्यमंत्र्यांना पुराव्यासह लक्षात आणून देण्यात आले. डॉ. झाकीर यांच्या प्रसाराचे अंग बनलेल्या सर्व व्यक्तींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि या प्रसारावर तत्परतेने बंदी घातली पाहिजे, अशी मागणी समितीने निवेदनाद्वारे केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीराम काणे, देहलीचे समन्वयक श्री. कार्तिक साळुंके, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि श्री. संजीव कुमार हे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात