अमरावती येथील हिंदुत्वनिष्ठांची जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
अमरावती : येथे छत्री तलावात भरपूर पाणी असतांनाही प्रतिवर्षी त्याच्या बाजूला छोटा कृत्रिम हौद आणि फुग्याचे टब सिद्ध करण्यात येतात. त्यात नागरिकांना गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास भाग पाडले जाते. नंतर जे.सी.बी. यंत्राच्या साहाय्याने विसर्जन न झालेल्या मूर्ती पाण्यात ढकलल्या जातात. कचरा वाहून नेणार्या गाड्यांमधूनही मूर्तींची वाहतूक केली जाते. तलावात विसर्जन केल्यास अपघात किंवा प्रदूषण होऊ शकते, अशी कारणे दिली जातात; मात्र अपघात न होण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. शहरातील लाखो लिटर सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता पिण्याच्या जलस्रोतात सोडले जाते. या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून छत्री तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नसतांनाही केवळ गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होत असल्याचा कांगावा केला जातो. ही विटंबना थांबवायला हवी. यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या तीन वर्षांपासून लढा देत आहे, अशा आशयाचे निवेदन येथील हिंदुत्वनिष्ठांनी जिल्हाधिकार्यांना दिले. या वेळी हिंदु जनजागृती समिती, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, योग वेदांत सेवा समिती या संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(म्हणे) ‘मला धर्म शिकवण्याची आवश्यकता नाही !’ – अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तांचा उद्दामपणा
महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार यांची भेट घेतल्यावर त्यांनी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांसमवेत वाद घातला आणि ‘मला धर्म शिकवण्याची आवश्यकता नाही. हा विषय माझा नाही. त्यामुळे मी काही करू शकत नाही’, असे म्हटले. (एकाच वेळी दुतोंडी विधाने करणारे म्हणे आयुक्त ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
हिंदुत्वनिष्ठांनी जिल्हाधिकारी श्री. खुशालसिंह परदेसी यांची भेट घेतली. त्यांनी माहिती देऊन निवेदनही दिले. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘मी तुमच्या भावना समजतो. गणेशोत्सवाच्या संदर्भात बैठक होईल, तेव्हा आम्ही तुम्हाला अवश्य संपर्क करू. आयुक्तांसमवेतही चर्चा करतो.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात