पणजी : गोव्यात पहिले संस्कृत महाविद्यालय चालू केल्याविषयी ब्रह्मानंद विद्या प्रबोधिनी या संस्थेचे २० जुलै या दिवशी विधानसभेत बहुतांश सदस्यांनी अभिनंदन केले.
भाजपचे आमदार राजेश पाटणेकर यांनी याविषयी अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावावर बोलतांना राज्यात ४० संस्कृत पाठशाळा आणि १ संस्कृत महाविद्यालय चालवणार्या ब्रह्मानंद विद्या प्रबोधिनीचे बहुतांश विधानसभा सदस्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर, मंत्री विजय सरदेसाई, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, माविन गुदिन्हो, पांडुरंग मडकईकर, बाबू आजगावकर, जयेश साळगावकर यांच्यासह काँग्रेसचे दिगंबर कामत, फ्रान्सिस सिल्वेरा, चंद्रकांत कवळेकर, प्रतापसिंह राणे, दयानंद सोपटे, भाजपचे नीलेश काब्राल, मायकल लोबो, प्रवीण झाट्ये, ग्लेन टिकलो, मगोपचे दीपक पाऊसकर, तसेच अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी ब्रह्मानंद प्रबोधिनीचे कौतुक करणारी भाषणे केली. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनीही या अभिनंदन प्रस्तावात सहभाग घेतला.
मंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हटलेल्या मंत्रांनी विधानसभेत वेगळ्याच वातावरणाची निर्मिती
अभिनंदन प्रस्तावावर बोलतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी गायंत्री मंत्र आणि अथर्वशीर्ष स्तोत्रातील एक मंत्र म्हटला. या मंत्रोच्चारामुळे विधानसभेत वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाली. या मंत्रोच्चारामुळे विधानसभेचे वातावरण पवित्र झाले आहे. सर्व सदस्यांनी पक्ष आणि धर्माचे भेद बाजूला सारून प्रबोधिनेचे अभिनंदन केले आहे. असेच वातावरण विधानसभेच्या पुढच्या दिवसांत राहू दे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले.
गोवा हे भौतिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विकसित होण्यासाठीचा पाया तपोभूमीने रचला ! – श्री. सुदिन ढवळीकर
श्री. सुदिन ढवळीकर म्हणाले, भौतिक विकासाबरोबर गोवा हे सांस्कृतिकदृष्ट्या विकसित राज्य होण्यासाठीचा पाया तपोभूमीने रचला आहे. माझ्या मतदारसंघात हे कार्य चालू आहे, याचा मला अभिमान आहे. मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, सभागृहातील सदस्यांनी पक्ष आणि धर्म यांच्या पलीकडे जाऊन या देवतुल्य कार्याचे कौतुक केले, यासाठी सर्व सदस्यांचे अभिनंदन. या संस्कृत विद्यापिठासाठी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आम्ही अडीच कोटी रुपये संमत केले आहेत. तपोभूमीने सामाजिक कार्य आणि आध्यात्मिक कार्य यांची सांगड घालून सर्वसामान्य लोकांना व्यसनापासून दूर ठेवण्याचे मोठे कार्य केले आहे. (असा प्रयत्न राजकारण्यांना सर्व यंत्रणा असतांना का करता येत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात