वॉशिंग्टन : पाकिस्तानमधील दहशतवादी हालचालींविरोधात आक्रमक झालेल्या अमेरिकेने आज पाकिस्तानला जबरदस्त धक्का दिला आहे. हक्कानी नेटवर्कविरोधात योग्य कारवाई न केल्याने अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी मदत रोखली आहे. पेंटॅगॉनने २०१६ च्या आर्थिक वर्षासाठी लष्करी सहायता निधी देण्यास नकार दिला आहे. अमेरिकी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संरक्षण सचिव जिम मॅटिस यांनी पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कविरोधात पुरेशी कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पेंटॅगॉनचे प्रवक्ते अॅडम स्टम यांनी सांगितले की, नॅशनल डिफेन्स अॅथॉराइजेशन अॅक्ट (एनडीएए) नुसार २०१६ या आर्थिक वर्षासाठी पाकिस्तानला निधी देता येणार नाही. कारण सचिवांनी हक्कानी नेटवर्कविरोधात पुरेशी कारवाई झाल्याचे प्रमाणित केलेले नाही. काही दिवसांपूर्वीच अमेरिकी काँग्रेसने पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील मदत म्हणून अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या निधीसाठीच्या अटी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक मदत देण्यापूर्वी पाकने दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईत समाधानकारक प्रगती दाखवायला हवी, अशीही अट त्यात आहे. संसदेने विधेयक मंजूर केले होते. दहशतवादाला पाककडून समर्थन मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर या अटी टाकण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या अधिकारी आणि संसद सदस्यांनी यापूर्वीही या विषयावर काळजी व्यक्त केली होती.
मंजूर विधेयकानुसार, संरक्षण मंत्र्यांना पाकिस्तानला आर्थिक सहाय्य देण्यापूर्वी हे प्रमाणित करावे लागेल की, पाकिस्तान ग्राउंडस लाइन्स ऑफ कम्युनिकेशनवर (जीएलओसी) सुरक्षा ठेवून आहे. संरक्षण मंत्र्यांना हे प्रमाणित करावे लागेल की, पाकिस्तान हक्कानी नेटवर्कला उत्तर वजिरिस्तान भागात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. अफगाणिस्त सीमेवर हक्कानी नेटवर्कसह अतिरेकी संघटनांच्या कारवायांवर लगाम लावण्यात पाकिस्तान अफगाणिस्तान सरकारच्या सोबत आहे, हे दाखवून द्यावे लागेल.
स्त्रोत : लोकमत