-
प्रयाग येथे द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्यासह १२०० साधू-संतांच्या उपस्थितीत धर्मसंसदेत विचारण्यात आला एकमुखी प्रश्न !
-
पंतप्रधानांनी एकवेळ हिंदूंची, जनतेची इच्छा पूर्ण केली नाही, तरी चालेल; परंतु साधू-संतांची इच्छा पूर्ण करावी !
-
राममंदिराची उभारणी झाली नाही, तर रस्त्यावर उतरण्याची चेतावणी !
प्रयाग : २०१३ मध्ये प्रयाग येथील धर्मसंसदेत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली होती. आता ६ फेब्रुवारी २०१६ या दिवशी येथे झालेल्या धर्मसंसदेत पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी यांना राममंदिरावरून प्रश्न विचारण्यात आले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीविषयी मौन बाळगल्यामुळे रागावलेल्या साधू-संतांनी मोदी यांना राममंदिराविषयी मन की बात का करत नाहीत ?, असा प्रश्न विचारला आहे.
साधू-संतांनी पुढे चेतावणी दिली की, जर राममंदिराची उभारणी झाली नाही, तर ते रस्त्यावर उतरतील. या धर्मसंसदेत द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, स्वामी अविमुक्तेश्वरानंदांसहित सर्व आखाड्यांचे साधू असे १ सहस्र २०० हून अधिक साधू-संत सहभागी झाले होते. धर्मसंसदेत शनिशिंगणापूर मंदिराच्या विषयावरही चर्चा झाली.
काशीसुमेरूपिठाचे शंकराचार्य स्वामी नरेंद्रानंदसरस्वती म्हणाले, या जगात कोणीही समान नाही, तर कार्यपद्धत कशी समान असू शकेल ? मला वाटते की, शनिशिंगणापूरमध्ये परंपरांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. शनिदेवाची केवळ पुरोहितांनाच पूजा करण्याची अनुमती मिळाली पाहिजे. यात प्रशासनाने हस्तक्षेप करू नये; मात्र जर हस्तक्षेप करण्यात आला, तर समाजात कलह निर्माण होऊ शकतो.
दांडी संन्यासी संघाचे स्वामी ब्रह्माश्रम म्हणाले की, आम्हाला आपली परंपरा पालटायला नको. या विषयावरून राजकारण होत आहे. जर कोणी परंपरेचा खेळ करत असेल, तर तो घातक आहे.
या धर्मसंसदेत संमत करण्यात आलेल्या १५ प्रस्तावांपैकी काही ठळक प्रस्ताव :
- समान नागरिक संहितेचे प्रारूप स्पष्ट करावे
- सोशल मीडियावरून धर्मविरोधी प्रचाराचा प्रतिवाद करावा
- शाळांमध्ये धार्मिक ग्रंथांचे शिक्षण द्यावे
- धर्मांतर बंद करण्यात यावे
- सनातन परंपरांमध्ये हस्तक्षेप बंद करावा
- गोहत्या आणि गोवंशांचे संकरीकरण बंद व्हावे
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात