Menu Close

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पावित्र्य राखणार – डॉ. अतुल भोसले

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची पहिली बैठक

येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पावित्र्य राखले जाणार असल्याची ग्वाही मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली. तर आतापर्यंत झालेल्या कामाची श्वेतपत्रिका काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची नियुक्ती झाल्यानंतर समितीची पहिली बैठक शुक्रवारी येथील तुकाराम भवन येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले होते. या बैठकीला ह.भ.प. गहिनीनाथ महाराज, भास्करगिरी गुरू किसनगिरीबाबा, संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, दिनेश कदम, सचिन अधटराव, नगराध्यक्षा साधना भोसले हे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत मंदिर समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. वारकऱ्यांच्या अडचणी कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा पूर्ण करावयाच्या या बाबतही चर्चा झाली. त्यानंतर नूतन अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये डॉ. भोसले म्हणाले, की १३ व्या शतकापासून श्री विठ्ठल मंदिराची परंपरा आहे. ती आज २१ व्या शतकातही सुरू आहे. अशा या परंपरा असलेल्या या मंदिराचे पावित्र्य जपणार आहे. तसेच पुट्टपार्थी म्हणजेच सत्यसाईबाबा, शिर्डीच्या धर्तीवर ‘विठ्ठल सेवक योजना’ सुरू करणार आहे. यामुळे मंदिराची स्वच्छता आणि इतर कामे होण्यास मदत होणार आहे.

भाविकांना सर्व सोयी उपलब्ध करून देताना पारदर्शी कारभार केला जाणार आहे. मंदिर समितीच्या वतीने आतापर्यंत झालेल्या कामाची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले. तर या पुढे समितीच्या वतीने होणाऱ्या कोणत्याही कामाची तपासणी शासकीय यंत्रणेकडून झाल्यावरच ते बिल संबंधितांना दिले जाणार आहे. तर चुकीची कामे करणाऱ्याची गय केली जाणार नाही असा सज्जड दमही त्यांनी दिला. मंदिर समितीमधील कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध लागू करण्याबाबत शासन दरबारी प्रयत्न करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले. मंदिर समितीच्या वतीने सुरू असलेल्या अन्नछत्रामध्ये गोंधळ असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. याला उत्तर देताना ते म्हणाले, की एफडीएच्या नियमावलीचे पालन करून भाविकांना स्वच्छ,पौष्टिक भोजन देणार आहे. विठ्ठल मंदिर समिती ही देशाच्या अग्रस्थानी आणणार असून, भाविकांना चांगल्या सोयी देण्याचे काम समितीचे सदस्य करणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

समितीची कोणतीही सुविधा घेणार नाही

मंदिर समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ. अतुल भोसले यांनी गुरुवारी स्वीकारली. अध्यक्ष या नात्याने समितीची कोणतीही सुविधा घेणार नसून भाविकांच्या सेवेला प्राधान्य देणार आहे. येथे भाविकांच्या निवासासाठी उभारण्यात येणाऱ्या भक्त निवासाचे काम पुढील तीन महिन्यांत पूर्ण करणार असून, कार्तिकी यात्रेपूर्वी भाविकांसाठी ते खुले करणार आहे. तर शुल्क आकारून देवदर्शन घेण्याचा निर्णय मागील समितीने घेतला होता तो रद्द केला आहे. समितीच्या वतीने विविध कामांचा कालबद्ध कार्यक्रम आखला जाणार असून, मुदतीत कामे पूर्ण होतील यावर भर देणार असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी सांगितले.

स्त्रोत : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *