मंदिरांत असे अपप्रकार करणार्यांवर देवीची कृपा कधी होईल का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
श्री क्षेत्र तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील श्री तुळजाभवानी मंदिराचे सरकारीकरण झाले आहे. सरकारीकरणामुळे मंदिराच्या झालेल्या दुःस्थितीचा काही देवीभक्तांनी घेतलेला आढावा येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. मंदिराचा कारभार एखाद्या सरकारी कार्यालयाप्रमाणे चालवल्यामुळे नित्य पूजेत अडचणी !
१ अ. प्रशासनाच्या सरकारी पद्धतींमुळे देवस्थानचे निर्णय प्रलंबित : ‘श्री तुळजाभवानी मंदिराचे सरकारीकरण झाल्यामुळे तेथील सर्व कारभार जिल्हाधिकारी पहातात. जिल्हाधिकारी त्यांच्या पदावर २ – ३ वर्षांच्या कालावधीसाठी येतात आणि त्यांचे स्थानांतर (बदली) झाले की, दुसरीकडे रुजू होतात. त्यांच्या २ – ३ वर्षांच्या कार्यकालामध्ये ते मंदिराशी संबंधित निर्णय घेत नाहीत, त्यामुळे मंदिराच्या दैनंदिन सेवांमध्ये पुष्कळ अडचणी येतात.
१ आ. पदाचा वापर व्यक्तीगत लाभासाठी करणारे भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी : श्री भवानीदेवीला देवस्थानकडून कधी पेढ्यांचा साधा नैवेद्यही दाखवला जात नाही. प्रशासकीय अधिकारी स्थानांतर होऊन येतात, भ्रष्टाचार करतात आणि देवस्थानची अपकीर्ती करून निघून जातात. या अधिकार्यांना देवाप्रती कोणतीही आस्था नसते. त्यांच्या पदाचा आणि अधिकारांचा वैयक्तिक स्वार्थासाठी कसा लाभ करून घेता येईल, केवळ एवढाच विचार करून अधिकारांचा गैरवापर करत असतात. ‘आपले अधिकार मंदिरातील सुधारणा आणि सुविधा यांसाठी वापरावेत’, अशी इच्छाशक्ती या अधिकार्यांमध्ये नसते.
२. देवीच्या अलंकारांच्या संदर्भात निष्क्रीय असलेले प्रशासन
२ अ. दागिने दुरुस्त करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष ! : देवीचे पूर्वापार अलंकार जिल्हाधिकार्यांच्या अधिकारात असल्याने त्यांनी या अलंकारांची योग्य काळजी घेणे, वेळोवेळी निर्णय घेऊन ते दुरुस्त करून घेणे आवश्यक असते; मात्र तसे होत नाही. मंदिरातील सेवेकर्यांनी पारदर्शकतेने सर्वांसमक्ष अलंकारांची दुरुस्ती करण्याची वारंवार विनवणी करूनही प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जाते.
२ आ. छबिन्याची छत्री, पलंग आदी नित्य सेवेतील वस्तूंविषयी हलगर्जीपणा : प्रतिदिन श्री भवानीदेवीच्या सेवेसाठी वापरली जाणारी छबिन्याची छत्री, पलंग प्रत्येक आठवड्याने पालटावे लागतात. सततच्या वापराने या नित्य सेवेतील वस्तू खराब होतात, तरीही त्यांची साधी डागडुजीही केली जात नाही. छत्री पालटून नवीन मागितली, तर तीही दिली जात नाही. ज्यावर देवी ५ दिवस किंवा ७ दिवस विश्रांती घेते, त्या देवीच्या पलंगाची साधी देखभालही प्रशासनाकडून केली जात नाही. मंदिर प्रशासनाचे हे दायित्व आहे. जिल्हाधिकारी हे मंदिर समितीचे अध्यक्ष असूनही त्यांच्या अनास्थेमुळे देवीच्या सेवेकर्यांना या वस्तू भक्तांकडून बनवून घ्याव्या लागतात.
२ इ. भक्ताने अर्पण केलेला सोन्याचा मुकुट देवीला न घालता तात्काळ जमा करून घेणारे लालची प्रशासन : काही दिवसांपूर्वी एका भक्ताने श्री भवानीदेवीच्या चरणी सोन्याचा सव्वा किलो वजनाचा मुकुट अर्पण केला. प्रशासनाने तो मुकुट देवीला न घालता तात्काळ जमा करून टाकला. खरे तर, देवीने त्या भक्ताची काहीतरी इच्छा पूर्ण केली होती, म्हणून त्याने तो मुकुट अर्पण केला होता. त्याच्या समाधानासाठी त्याच्यासमोर तो मुकुट देवीला घालावा. एखादा दिवस ठेवावा, एवढेही सौजन्य मंदिर प्रशासनाने दाखवले नाही.
२ ई. ‘स्ट्राँग रूम’ची चावी सेवेकर्यांकडे असल्यामुळे मौल्यवान वस्तू आणि दागिने सुरक्षित रहाणे : श्री भवानीदेवीच्या अलंकारांचे डबे आणि मौल्यवान वस्तू एका ‘स्ट्राँग रूम’मध्ये ठेवल्या जातात. त्या ‘स्ट्राँग रूम’ला दोन दरवाजे आहेत. दोन्ही दरवाजांपैकी एका दरवाजाची चावी मंदिर प्रशासनाकडे आणि दुसर्या दरवाजाची चावी सेवेकर्यांकडे असते. श्री भवानीदेवीच्या अलंकारांच्या डब्यांच्या चाव्या सेवेकर्यांकडे असतात.
दोघांकडे दोन दरवाज्यांच्या चाव्या असल्यामुळे कोणाही एकाला त्यातील वस्तू काढता येत नाहीत. वस्तू अथवा दागिने काढायला दोघांनाही उपस्थित रहावे लागते.
३. तीर्थकुंडांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तेथे निर्माण झालेले कचर्याचे साम्राज्य
मंदिरात रामकुंड, सूर्यकुंड, चंद्रकुंड, अंधारकुंड अशी तीर्थकुंडे आहेत. या प्रत्येक पवित्र कुंडाचे वैशिष्ट्यपूर्ण महात्म्य आहे; मात्र भोंगळ प्रशासनाच्या अधिपत्याखाली या सर्व कुंडांची स्थिती एखादे कचराकुंड वाटावे, इतकी भयाण झाली आहे. प्रशासकीय अधिकार्यांना त्याचे काहीही वैषम्य वाटत नाही. त्यांची विचारसरणी आणि चिंता केवळ मंत्री आल्यानंतर त्यांचा सत्कार कसा करावा, त्याचा लाभ स्वत:ला कसा होईल आणि मंत्र्यांना कसे सहकार्य करू शकतो, एवढ्यापुरतीच मर्यादित आहे.
४. मंदिरातील अर्पणावर डोळा असलेले; मात्र सुविधा उपलब्ध करण्यास उदासीन असलेले दायित्वशून्य प्रशासन !
४ अ. एका भक्ताने श्री भवानीदेवीच्या मंदिराच्या आवारात सौरऊर्जेवर चालणारे दिवे बसवले आहेत. नवरात्रीच्या कालावधीत संपूर्ण मंदिर या सौरदिव्यांच्या प्रकाशाने उजळते. या दिव्यांचा प्रतिवर्षाचा देखभाल-दुरुस्तीचा एकूण व्यय ५० लक्ष रुपयांहून अधिक आहे; पण कोट्यवधी रुपयांचा अर्पणनिधी असूनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रतिवर्षी त्या भक्तालाच या सौरदिव्यांच्या देखभालीचा व्यय करावा लागतो.
४ आ. पुणे येथे श्री भवानीदेवीचे आणखी एक भक्त आहेत, ते प्रतिवर्षी स्वखर्चाने नवरात्रीतील ९ दिवस संपूर्ण मंदिराची फुलांनी सजावट करतात; पण या प्रशासकीय अधिकार्यांना त्याचे काही मूल्य नाही.
५. अधर्माचरण करणार्यांना देवीने शासन केल्याच्या संदर्भातील देवीभक्तांना कळलेली सत्य घटना !
तिथे एक पोलीस अधिकारी होते. ते एवढे उद्दाम होते की, देवीच्या परड्यांना लाथ मारून उडवून द्यायचे. एकदा ते पोलीस अधिकारी आणि त्यांची पत्नी तेथील जवळच्याच खानावळीत जेवायला गेले होते. तिथून येत असतांना त्यांच्या गाडीला अपघात होऊन दोघांचाही अपघातस्थळीच मृत्यू झाला. पुष्कळ संपत्तीचा वारस असूनही आज त्यांच्या मुलाला आश्रमशाळेत रहावे लागत आहे.
एकूणच श्री भवानीदेवीच्या मंदिरातील प्रशासनाची दु:स्थिती पहाता हे मंदिर सरकारच्या कह्यातून काढून घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यावर आजच गांभीर्याने विचार केला नाही, तर मोगलांनी हिंदूंच्या मंदिरांची जी स्थिती केली, त्याहून भयानक स्थिती हे धर्मद्वेष्टे प्रशासकीय अधिकारी करतील, यात शंका नाही.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात