श्री गणेशमूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडूनही प्रबोधन केले जाणार
कोल्हापूर : गणेशोत्सवात पुरोगामी आणि पर्यावरणवादी संघटनांकडून घरगुती अन् गणेशोत्सव मंडळे यांचा श्री गणेशमूर्ती दान करण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जातो. याला प्रशासनाचीही साथ असते; मात्र हिंदु धर्मानुसार गणेशमूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करणे अनिवार्य असून पूर्वापारपासून चालू असलेली परंपरा बंद करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत आहे. हिंदु सणांवरच हे निर्बंध का ? हिंदु सणांवर कोणाचाही दबाव खपवून घेणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २२ जुलैला झालेल्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्राथमिक बैठकीत ते बोलत होते.
मूर्ती वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यासाठी शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित आल्या असून त्यादृष्टीने प्रबोधन करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
ज्येष्ठ हिंदुत्वनिष्ठ श्री. बाबा वाघापुरकर, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत बराले, कार्यकर्ते सर्वश्री अण्णा पोतदार, शिवाजीराव ससे, हिंदु महासभेचे शहराध्यक्ष श्री. मनोहर सोरप, सौ. सुवर्णा पोवार, सौ. रश्मी आडसुळे,
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहराध्यक्ष श्री. शरद माळी, शिवसेनेचे सर्वश्री कमलाकर किलकिले, जयवंत हरुगले, सुनील जाधव, उदय भोसले, रमेश खाडे, दीपक चव्हाण, सागर घोरपडे, धनजी दळवी, तुकाराम साळोखे, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते
श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले की,
१. नदी प्रदूषणाच्या इतर प्रमुख कारणांकडे डोळेझाक करून हिंदूंच्या सणांवर निर्बंध घालण्यासाठीच श्री गणेशमूर्ती दान करण्याचा नसता उद्योग चालू आहे. गणेशमूर्तीचे नदीत विसर्जन केल्यामुळे प्रदूषण होण्याचे प्रमाण ०.९ टक्के इतके आहे. असे असतांना ९९ टक्के प्रदूषण ज्या घटकांमुळे होते, त्यांवर आळा घातला जात नाही.
२. हिंदु सणांना लक्ष्य करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयोग आहे; मात्र शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकसंघ होऊन हा दबाव मोडून काढतील.
३. हिंदूंच्या धार्मिक सणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणालाच नसून कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. दान केलेल्या गणेशमूर्तींची नास्तिकवाद्यांकडून विटंबना केली जाते. भक्तीभावाने पुजलेल्या गणेशमूर्तींची अशी विटंबना खपवून घेतली जाणार नाही. मूर्तींच्या विटंबनेविषयी विविध माध्यमांतून नागरिकांचे प्रबोधन हिंदुत्वनिष्ठ संघटना करतील.
४. मूर्ती दान करा, असे आवाहन करणार्यांना महापालिका प्रशासनाकडून मंडप आणि सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात; मात्र वाहत्या पाण्यात मूर्तींचे विसर्जन करणार्या हिंदुत्वनिष्ठांना अशा सुविधा पुरवल्या जात नाहीत.
हिंदुत्वनिष्ठांचे मनोगत
१. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे – हिंदूंच्या सणांवर न्यायालयाच्या आदेशानुसार निर्बंध आणायचे आणि अन्य निर्णयांना बगल देऊन न्यायालयाचा अवमान करायचा, ही प्रशासनाची पद्धत चुकीची आहे. सर्वांना समान न्याय या भावनेने प्रशासनाने कृती करणे आवश्यक आहे.
२. अखिल भारतीय हिंदु महासभेचे श्री. संजय कुलकर्णी – हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हा डाव उधळून लावावा आणि नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी आजपासूनच प्रारंभ करावा !
३. संजय गांधी योजनेचे अध्यक्ष श्री. किशोर घाटगे – प्रदूषणाचे कारण देत मूर्ती दान करण्यास सांगणारे ज्या प्रकारे विज्ञापने दाखवतात, तशीच विज्ञापने गणेशमूर्तींच्या विटंबनेचीही दाखवणे आवश्यक आहे. आता हिंदुत्वनिष्ठ संघटनाही मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन करण्याचे विज्ञापन करतील.
४. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सुरेश यादव – गेल्या वर्षी शिरोली गावात १०० टक्के मूर्ती विसर्जनाचा उपक्रम राबवून एकही मूर्ती दान केली गेली नाही. सर्वांनी ठरवल्यास कोल्हापूर शहरात हा उपक्रम यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात