न्यूयॉर्क : पाकिस्तानची शक्तिशाली गुप्तचर संस्था प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींना सहकार्य करीत होती आणि इसिसचा उदय होण्यामागे पाकिस्तानची ही संस्थाच असू शकते, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या प्रतिष्ठित अमेरिकी दैनिकाने म्हटले आहे.
याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या संपादकीय लेखात म्हटले आहे की, अनेक विदेशी संघर्षात पाकिस्तानचा हात आहे. तज्ज्ञांनी याबाबत अनेक पुरावे जमा केले आहेत. ते पाहता पाकिस्ताननेच तालिबानच्या अभियानात मदत केली. पाकिस्तानचा हा व्यवहार केवळ अफगाणिस्तानपुरताच मर्यादित नाही, तर अनेक विदेशी संघर्षातही पाकिस्तान हस्तक्षेप करीत आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय मुजाहिद्दीन शक्तीचा प्रबंधक म्हणून काम केले आहे. त्यात बहुतेक सुन्नी कट्टरपंथी होते. इस्लामिक स्टेट किंवा ‘इसिस’चा उदय होण्यामागेही पाकिस्तानच असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तालिबान आणि अल काईदा यांना ‘आश्रय’ दिल्याचा पाकिस्तान भलेही इन्कार करीत असला तरीही आणि आपण स्वत:च दहशतवाद्यांचे शिकार बनलो आहोत, असा दावा करीत असला तरीही विश्लेषकांजवळ पाकिस्तानच्या भूमिकेचा सविस्तर अहवाल आहे. देशांतर्गत स्तरावर राष्ट्रीय आंदोलने चिरडण्यासाठी आणि त्यातही पश्तून समुदायाचे आंदोलन चिरडण्यासाठी इस्लामी दहशतवाद्यांचा शस्त्र म्हणून वापर करण्यासाठी त्यांचे पालणपोषण केले, हे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या उत्तर आफ्रिकेच्या प्रतिनिधी कार्लोट गाल यांनी लिहिलेल्या या लेखात म्हटले आहे की, अफगाणिस्तान हा आपलाच भूप्रदेश असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानात आपला प्रतिस्पर्धी भारताला आपले पाय रोवण्यापासून रोखण्यासाठी तेथील सुन्नी इस्लामी अतिरेकी कायम राहावेत यासाठी पाकिस्तान तालिबानचा वापर करीत आहे.
तालिबानच्या अजेंड्याला चिथावणी देण्यासाठी त्यांना आश्रम देऊन त्यांना शक्य ती सर्व मदत केली आणि असे न करणाऱ्यांना नेस्तनाबूत केले. हीच बाब अल काईदा आणि अन्य विदेशी गनिमांना लागू होते.
संदर्भ : लोकमत