औरंगाबाद : गोरक्षकांकडून देशभरात विविध ठिकाणी हत्या करण्यात आल्या. त्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नियोजन असल्याचा आरोप एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदोद्दीन यांनी केला. शनिवारी त्यांच्या नेतृत्वात मौलाना आझाद चौक ते भडकल गेट खामोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या समारोपप्रसंगी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. मोदी नेहमी सबका साथ सबका विकासाचा नारा देतात. मात्र, गेल्या तीन वर्षात देशात गोरक्षकांकडून ३५ जणांच्या हत्या झाल्या. त्यात २८ जण मुस्लिम, सात दलित होते. हत्या करणाऱ्यांविरुद्ध सरकारने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही, असेही ते म्हणाले.
आझाद चौकातून सायंकाळी ६ वाजता निघालेला मोर्चा ८ च्या दरम्यान भडकल गेट येथे पोहचला. तेथे ओवेसी म्हणाले की, पुण्यातील मोहसीन शेख, नागालँडमधील सय्यद फरिद खान, दादरी येथील इकलाख, सहारनपूर येथील नुमान, हरियाणातील खुशनुर, झारखंडमधील मस्तान, गुजराथ येथील मोहम्मद आयुब, वल्लभगड येथील जुवेद यांना जमावाने बेदम मारहाण करत त्यांचा जीव घेतला.
घोषणांत शक्ती वाया घालवू नका
केवळ घोषणांत तुमची शक्ती वाया घालवू नका असे सांगत ओवेसी यांनी तुम्हारा जुलुम काफी है, हमे दिदार करने के लिये… जो लोहा जुल्म सहेता है, वही हत्यार बनता है, असा शेरही पेश केला.
यावेळी डॉ. गफ्फार कादरी, मनपा विरोधी पक्ष नेता फिरोज खान, शहर जिल्हाध्यक्ष अज्जु नाईकवाडी, नगरसेवक गंगाधर ढगे, नासेर सिद्दीकी, अरुण बोर्डे आदी उपस्थित होते. रजा अकादमी, अैले सुन्नतूल जमाअत, मदलीसे उलैमा, जमैतुल उलैमा, मरकजे उलूम शरीया यांच्यासह इतर धार्मिक संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिला होता.
संपूर्ण भाषणात पंतप्रधान मोदी यांच्या उल्लेख ओवेसी यांनी मिस्टर मोदी असा केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि मोदी यांची भेट म्हणजे केवळ गळाभेटीचा कार्यक्रम होता. ट्रम्प म्हणजे लाला असून तो आपल्या देशाला लुबाडत अाहे. गोमांसावरून घडलेल्या घटनांचा तपास न्यायालयाच्या निगराणीत विशेष पथकाने करायला हवा. हा प्रश्न मी संसदेत देखील मांडणार नाही. आमचा विरोध या देशातील हिंदूंना नाही तर सावरकरांच्या हिंदुत्व मानसिकतेला असल्याचे ओवेसी म्हणाले.
संदर्भ : दिव्य मराठी