कोल्हापूर : २४ जुलैपासून चालू होणार्या पावसाळी अधिवेशनात पंढरपूर, शिडीॅ, तुळजापूर येथील मंदिरांप्रमाणे शहरातील श्री महालक्ष्मी मंदिरात सरकारी पुजारी नियुक्त करणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा घोटाळा, पेट्रोल-डिझेल विक्रीतून नागरिकांची होणारी लूट, ‘सर्किट बेंच’, रखडलेली जलवाहिनी योजना आणि त्यातील अपकारभार, उघडपणे चालू असलेला मटका व्यवसाय, झूम प्रकल्प, शिवाजी पूल आदी ८० तारांकित प्रश्न, १० लक्ष्यवेधी सूचना उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी २३ जुलैला घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
श्री. राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले की,
१. श्री महालक्ष्मी मंदिराच्या बाहेर देवस्थान व्यवस्थापन समितीने आणि गाभार्यात श्रीपूजकांनी लूट चालवली आहे. आजअखेर मला एकाही श्रीपूजकाने मंदिरातील प्रसाद म्हणून पेढा आणून दिलेला नाही, तर सर्वसामान्य माणसाला काय मिळणार ?
२. पगारी श्रीपूजकांची नियुक्ती केल्यानंतर त्यांना काही त्रास होणार नाही; कारण आतापर्यंत श्रीपूजकांनी भरपूर पैसे कमावले आहेत.
३. देवस्थान समितीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) स्थापन झाले; मात्र या पथकाने ‘६ मासांत या प्रकरणाची चौकशी करतो’, असे सांगूनही ती पूर्ण झालेली नाही. तुळजापूर मंदिराची अशीच अवस्था आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधणार आहे.
४. मी स्वतः श्रीपूजकांचे हक्क अबाधित राखून त्यांच्या विरोधात वरील भूमिका मांडली आहे; मात्र मी जातीपातीच्या विरोधात नाही. सत्य परिस्थिती पुढे येण्यासाठी प्रयत्न करत आहे.
५. मंदिरात कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो, तरीही सुविधा मिळत नाहीत. देवस्थान समितीची एकूण ३३ सहस्र एकर भूमी भाडेपट्ट्याने दिल्यास कोट्यवधी रुपये मिळतील.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात