श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’ !
प्राचीनकाळी सत्येश्वरी नावाच्या एका कनिष्ठ देवीला सत्येश्वर नावाचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करेल, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून महिला नागपंचमी साजरी करतात.
महाराष्ट्रातही नागपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होते. बत्तीस शिराळ्यामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा होती. नागपंचमीच्या दिवशी स्वतः गोरक्षनाथ महाजनांच्या घरासमोर उभे राहिले आणि त्यांनी ‘माई भिक्षा वाढ’ अशी हाक दिली. महाजनांच्या सुनेला बाहेर यायला थोडा वेळ झाला. गोरक्षनाथांनी विचारले, ‘एवढा वेळ का ?’ त्या महिलेने उत्तर दिले की, आज नागपंचमी आहे, म्हणून मी नाग प्रतिमेची पूजा करत होते. गोरक्षनाथ म्हणाले, ‘‘आजपासून या गावामध्ये जिवंत नागाची पूजा होईल.’’ त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मंत्र सामर्थ्याने त्या ठिकाणी जिवंत नाग प्रकट केला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी बत्तीस शिराळा येथे जिवंत नागाची पूजा होऊ लागली.
साधारण ३ वर्षांपूर्वी काही पर्यावरणवाद्यांनी नाग पकडण्याच्या प्रथेला आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. न्यायालयानेही वर्ष २०१५ मध्ये नाग किंवा तत्सम प्राण्यांना पकडून त्यांचे जाहीर प्रदर्शन करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत असे आढळल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून ही परंपरा बंद झाली. बिहारमधील समस्तीपूरमध्ये आणि अशा अन्य ठिकाणी जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा मात्र कायम आहे. बहुतांश ‘जन्महिंदूं’ ना धर्मशिक्षण नसल्याने सण उत्सवांमध्ये अपप्रकार घडतात. बत्तीस शिराळ्यातही काही मोजक्या व्यक्तींकडून नाग पकडून त्यांचे निरनिराळ्या पद्धतीने हाल करण्यात आले; पण यामुळे कायदा आणून परंपरेलाच निर्बंध घालण्यात आले. या प्रकरणी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिराळा ग्रामवासियांना ‘परंपरेला खंडित होऊ देणार नाही, त्यासाठी कायद्यात योग्य तो पालट करण्याचा प्रयत्न करू’, असे आश्वासन दिले.
नवनाथांपैकी एक असलेल्या गोरक्षनाथांनी प्रारंभ केलेल्या या परंपरेवर घातलेल्या निर्बंधांचा पुन्हा एकदा विचार व्हायला हवा, अशी श्रद्धाळू हिंदूंची मागणी आहे. लोकांना धर्मशिक्षित करून सण योग्यरित्या साजरे करण्याचे महत्त्व त्यांच्यावर बिंबवायला हवे. शासनाने धर्मशास्त्रासहित गोरक्षनाथांनी दिलेल्या प्रचीतीचाही विचार करावा, तरच सण उत्सव टिकून रहातील. यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे !
– श्री. केतन पाटील, पुणे
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात