Video : अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात माकडाचे ध्यान त्यानंतर भाविकांना दिला आशिर्वाद
Share On :
सोलापूर : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात दररोज हजारो भाविक येऊन दर्शन घेतात. कुठल्याही दिवशी या मंदिरात भाविकांची तितकीच वर्दळ पाहायला मिळते. विशेषकरून गुरूवारी तेथे नित्यनियमाने भाविक स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असतात. पण हा गुरूवार अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांसाठी खास ठरला. कारण या गुरूवारी भाविकांना स्वामींच्या मंदिरात चक्क माकडाचे ध्यान पहायला मिळाले. गुरूवारी सकाळी गर्दीच्या वेळी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूला लोकांना माकडाचे दर्शन झाले. मंदिरात हे माकड आले कसे असा प्रश्नही अनेकांना पडला. मंदिराच्या दाराजवळ हे माकड तब्बल १० मिनीटे बसून ध्यान करत होते. मंदिरात अचानक आलेल्या माकडाला पाहून तेथील काही भाविकांनी त्याच्या बाजूला खाण्यासाठी दाणे ठेवले पण माकड चिंतनात इतके व्यस्त होते की त्याने आजूबाजूला पाहिलेही नाही. स्वामींच्या गाभाऱ्यात सुरू असलेली पूजा त्या माकडाने दरवाजात बसून पाहिली.
मंदिरातील चिंतन झाल्यानंतर या माकडाने आपली स्वारी मंदिराबाहेर वळविली. मंदिराच्या बाहेर असलेल्या दगडावर बसून त्याने भाविकांना आशिर्वाद द्यायला सुरूवात केली. माकडाला दगडावर बसलेले पाहून अनेक भाविक दाणे किंवा फळ घेऊन त्याच्या जवळ येत होते. आपल्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर त्या माकडाने हात फिरवला. गुरूवारी स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबरच हनुमानाचेही दर्शन झाल्याची भावना लोकांनी व्यक्त केली आहे. बऱ्याचदा माकड किंवा कुठलाही प्राणी अचानक समोर आला तर लोक बिचकतात अन्यथा त्या प्राण्यापासून लांब जातात. पण अक्कलकोटमधील स्वामी समर्थांच्या मंदिरात असे झाले नाही. तेथील लहानमुलांपासून ते वृद्धापर्यंत सगळेच न घाबरता माकडासमोर जात होते आणि आशिर्वाद घेत होते.
सोलापूरपासून ३८ किलोमीटर अंतरावर असलेले अक्कलकोट हे देशभरातील स्वामी समर्थ भक्तांचे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. १९ व्या शतकातील वटवृक्ष महाराजांची समाधी हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोट मंदिरात मोठा उत्सव पहायला मिळतो. येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व असंख्य स्वामीभक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो. हा उत्सव पाहण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात हजर असतात.